• Menu
  • Menu

सफर लंडनची ….!!

दुसऱ्या दिवशी सकाळी १० च्या सुमारास बाहेर पडलो. बसने इस्ट क्रोयडन स्टेशन आणि तिथून मग व्हक्टोरिया स्टेशनला आलो. या ट्रेनमधून आजूबाजूचा परिसर पाहायला मिळत होता, कारण हि ट्रेन जमिनीवरून जाते.  रुळाच्या बाजूला बंगल्यांची परसं दिसत होती. छान हिरवळ आणि बऱ्याच घरात बार्बेक्यू पण दिसत होते. तसेच कुत्र्याचं खुराडं, सुंदर बाग, क्वचित भाज्यापण तसंच खांबावर दोऱ्या लावून वाळत घातलेले कपडे.असं सारं दिसत होतं. मजा वाटत होती. देश पाहताना हेच तर खरं पाहायला हवं. माणसं राहतात कशी, त्यांच्यातले संबंध, कुटुंब,मुलं, म्हातारे, बायका सारे मिळूनच तो देश बनत असतो. ऐतिहासिक वास्तू, निसर्ग हे त्याचं एक अंग मात्र. बाकी ते शहर गल्ल्या, गावं सारं काही पाहिलं तरच देश पाहिल्याचं समाधान मिळतं. नसता नुसतीच शोकेस पाहिल्यासारखं प्रक्षणीय स्थळं बघणं मनाला पटत नाही. हे असं जग बघायला मिळालं कि कसं जिवंत वाटतं सारं.  एकसारखी कौलारू घरं त्यावर असलेली धुरांडी, लाल छपरं आणि पांढरट रंग हे अगदी स्टॅण्डर्ड डिझाईन आहे तिथलं घरांचं. तिथल्या नगरनिगमने ठरवलेल्या डिझाईनचीच घरं बांधावी लागतात. बाहेरून ती एकसारखी दिसावीत या साठी हि व्यवस्था आहे. क्वचित उंच बिल्डिंग्ज दिसत होत्या काँक्रीटच्या, क्लॅडिंग केलेल्या पण खूपच कमी.

 थोड्याच वेळात व्हिक्टोरिया स्टेशन ला आलो. तिथून एस्केलेटर ने खाली आलो आणि बाहेर पडलो. चालत निघालो. कुठल्याशा गल्लीतून दूरवर लंडन आय हा आकाश पाळणा दिसत होता. तोच लंडनआय जे आपण लंडनची ओळख म्हणून नेहेमी पाहतो. नदीकिनाऱ्यावरचा तो विशाल आकाश पाळणा त्याच्या त्या काचेच्या कॅप्सूल्स. आम्ही तेच पाहिलांदा पाहून लंडन दर्शनाचा श्रीगणेशा करणार होतो. पावलं त्या दिशेनं निघाली. तिथे खूप गर्दी होती. लोक फोटो काढत होते. तिकिटासाठीही खूप लांब रंग लागलेली होतीच, तशीच ती त्या पाळण्यात बसण्यासाठीही लागलेली. थेम्स नदीवर उभारलेल्या ह्या आकाश पाळण्याचे उदघाटन ३१ डिसेम्बर १९९९ च्या मध्यरात्री झाले ते नव्या सहस्रकाच्या स्वागतासाठी. ४४३ फूट उंच आणि ३९४ फुटांचा व्यास असलेला हा पाळणा ज्यावेळी बांधला त्यावेळी जगातला सर्वात उंच होता.  त्यात ३२ काचेच्या कुप्या ज्यामधून सारं लंडन दिसेल याची व्यवस्था केलेली आहे. पण मजा म्हणजे नंबर मात्र १-३३ आहेत.. कारण ब्रिटिश अंधश्रद्धेनुसार १३ हा एकदा सैतानाचा नंबर असतो त्यामुळं तो वगळण्यात आलाय. त्यामुळं त्यात १२ नंतर १४ नम्बर ची कॅप्सूल आहे. मानवी मन सगळीकडे सारखंच असतं मग देश कितीका पुढारलेला का असेना. ते कशाचा तरी संबंध कशाशी तरी जोडतं आणि हळूहळू त्याचं रूढीत, श्रद्धेत रूपांतर होत. आपण त्याला कधी अंधश्रद्धा म्हणतो कधी खुळेपणा पण जनमानसा पुढे शहाणपण चालत नाही हेच खरं. असो तर अशा या कॅप्सूल मध्ये एका वेळी साधारण २५ लोक बसू शकतात. त्याचं चक्र पूर्ण व्हायला साधारण अर्धा तासाचा वेळ लागतो. आम्ही रांगेत आमची पाळी येण्याची वाट पाहत होतो. हळूहळू रांग पुढे सरकत होती. थोड्याच वेळात आमचा नंबर लागला. आणि आम्ही त्या कुपीत प्रवेश केला. कुपी भरल्यावर बंद झाली आणि वरवर सरकू लागली. त्यात बसायलाही बाकं ठेवलेली. पण उभारून सारं लंडन पाहायलाच जास्त मजा येत होती. अर्थात खूप वेळ उभारून पाय दुखले तर हि व्यवस्था आवश्यकच म्हणा. बाजूनं वाहणारी थेम्स आता खाली गेली. तिच्यावरचे पूल, नदीत फिरणाऱ्या बोटी, फेरीबोटी सारं दिसत होत. जसजशी ती कुपी वर जाऊ लागली तसं लंडनची आणखी एक ओळख असणारं ते भलं मोठठं घड्याळ असलेलं बिगबेन टॉवर दिसाय लागलं. सारं कुतूहलानं मी पाहत होते. सर्वदूर पसरलेलं लंडन आता हळू हळू दूरवर दिसत होतं. खूप सुंदर दिसत होत. सगळीकडे शतकानुशतकं उभ्याअसलेल्या देखण्या दगडी इमारती त्यांचं  ते वैशिष्ट्यपूर्ण कमानी आणि मनोऱ्यांचं आकर्षक रुपडं नजरेत भरत होतं. क्वचित उंच, आधुनिक इमारती दिसत होत्या. आता आणखीन दूरचं दिसू लागलं. आता लंडनचं ते प्रसिध्द्य हाईडपार्क दिसायला लागलं. अर्थात ते हाईड पार्क आहे हि माहिती मला माझा नवराच देत होता कारण तो यापूर्वी इथे येऊन गेलेला. (त्याचाच जीवावर तर आपल्या आपणच लंडन पाहायची तयारी केलेली.)

लंडन उलगडत होतं. इमारती माणसं सारं आता छोटं व्हायला लागलं. पण मोठ्ठा कॅनवास उलगडत होता. काही ठिकाण ओळखीची वाटत होती. जसं की लंडन ब्रिज, बिगबेन.. पण जे काही दिसत होतं ते रमणीय निश्चित होतं. ब्रिजवरून जाणाऱ्या त्या लाल बसेस मोठया गोड दिसत होत्या. ब्रिटिश लोकाना परंपरा जपण्यात फार आनंद मिळतो.  त्यांना त्या जुन्या गोष्टीचा कोण अभिमान. म्हणून तर आजही इंग्लिश लोक राणी, राजघराणं यांच्या जणू प्र्मातच असतात. त्यांच्या विषयी आवडीनं वाचतात. चवीनं चर्चा करतात. तशीच त्यांची ती काळी टॅक्सी, ती टुमदार लाल बस, मोबाईलच्या जमान्यातही बाबा आदमच्या जमान्याची आठवण करून देणारी ती लाल टेलिफोन बूथ्स आणि त्यातला तबकडीवाला फोन, ते घोडदळ, सारं सारं अगदी प्रेमानं जपतात आणि यांच्या त्याच परंपरा आणि रुढीप्रिय समाजाचं आपल्यालाही आकर्षण वाटत आणि आपणही नकळत लंडनच्या प्रेमात पडतो.

वेस्टमिन्स्टर ऍबे च्यावर दिमाखात फडकणारा हाच तो युनियन ध्वज जो उतरवण्यासाठी आपण कोण संघर्ष केला. पण इथे तो दिमाखानं फडकताना पाहायला आपल्यालाही आवडून जातो. अगदी वरच्या टोकाला आल्यावर आख्ख लंडन असं नजरेच्या कवेत येतं. फारच सुंदर दृश्य असतं. तिथंच थांबून राहावंसं वाटते पण वर गेलेला खाली येणारच या न्यायानं आपणही खाली सरकू लागतो. आमची ती पाळण्याची सफर संपली आणि मग आम्ही फिश न चिप्स खाण्यासाठी तिथेच पुढे असलेल्या रेस्टारंट मध्ये गेलो. हा इथला अति लोकप्रिय पदार्थ. प्रचंड तेलात पचपचलेला तो पदार्थ खाताना कॅलरिज दिसत होत्या. पण आजूबाजूचे लोक मिटक्या मारत ते खात होते. तेलकट असलं तरी त्याच्या आतलं फिश मात्र एकदम मऊ चवदार होतं. त्यामुळंच बहुदा लोकांच्या आवडीचं असेल.

तिथून मग आम्ही पुलाच्या पल्याड असेलल्या वेस्टमिन्स्टर ऍबे ला निघालो.  पुलावरून जाताना नदीवरचा भणाणा सुटलेला वारा कपडे, केस उडवत होता. इथे साडीचं काय होणार हा प्रश्न सहजच मनात आला असो. इथेच त्यांचं पार्लमेंट असल्याने वाटेत जागोजागी पोलीस होते. पर्यटकही भरपूर होते. त्या पोलीसांचा भीतभीतच मी एक फोटो काढला. बाकीचेही लोक त्यांचे फोटो काढत होते. त्यामुळं माझी भीड थोडी चेपली मग मी त्याला माझ्यासोबत एक फोटो काढशील का म्हणून विचारलं तर तो चक्क हो म्हणाला आणि माझ्यासोबत मस्त पोज देऊन उभारला!!

तिथेच रस्त्याच्या पल्याड असलेल्या हिरवळीवर लोक मस्त आराम करत बसलेले. तिथेच चर्चीलचा मोठा पुतळा पण आहे. काही लोक फोटो काढत होते. तरुणतरुणींचं प्रणयाराधनही चाललेलं.  आम्हीही तिथेच थोडावेळ आराम केला आणि  थोड्या वेळाने  निघालॊ. तिथून चालत चालत डाउनिंग स्ट्रीट ला आलो. इथेच इंग्लंडच्या पंतप्रधानांचं ते जगद्विख्यात निवासस्थान आहे “१० डाउनिंग स्ट्रीट”. आता तिथे थोड्या  लोकांची आणि मिडीयाचीही थोडीफार गर्दी होती. कारण नुकतंच ब्रेग्झिट चा निकाल लागलेला होता आणि डेव्हिड कॅमेरून यांच्यावर राजीनामा देण्यासाठी प्रचंड दबाव होता. डाउनिंग स्ट्रीट वर आतल्या बाजूला पंतप्रधानांचं निवासस्थान आहे. इथून फक्त तो प्रसिद्ध दरवाजा तेवढा दिसत होता. बाकी सारी नुसतीच ५-६ मजली इमारत बाजूच्या एकसारख्या इमारतीतीलच हि एक. आपल्याला पंतप्रधानाचं निवास स्थान म्हणजे भलं मोठं अंगण, बाग ते पोर्च असं बरच काही डोक्यात असत पण इथे मात्र नुसतंच दार दिसतं ज्यातून पंतप्रधान आतबाहेर करताना, तिथून बाहेर येऊन पत्रकारांशी बोलताना आपण टीव्ही वर बऱ्याचदा पाहिलेलं असतं. तेव्हा मला नेहमीच हे असं जगावेगळं पंतप्रधान निवासस्थान कसं असेल याचं कुतूहल वाटायचं. आज ते प्रत्यक्ष [पाहायला मिळत होतं. लंडन मधल्या इतर इमारतींसारखीच असलेली हीही इमारत होती. तशीच समोर दरवाजा आणि त्या आत घर असं काहीसं स्वरूप असतं. त्यामुळं सलग दगडी एकसारख्या उंचीच्या इमारती दिसतात. रंगही पांढराच कुठेही रंगीबिरंगी असं काही दिसत नाही. त्यात कंपाउंड, गार्डन , पोर्च असलं काही दर्शनी भागात दिसत नाही. अगदी इस्त्री केलेल्या पांढऱ्या कपड्यातले ऑफिसर्स गंभीर चेहेऱ्याने फिरत असावेत तसं वाटलं मला त्या परिसरात. अर्थात त्यामुळं गाड्या कशा आणि कुठं लावत असतील हा प्रश्न मला काही सुटला नाही. फक्त एखाद्या पंतप्रधानाचं निवास्थान इतकं रस्त्यावर कसं याचं काहीसं उत्तर मिळालेलं की ते मुख्य रस्त्याच्या आतल्या गल्लीत आहे, ज्या गल्लीच्या तोंडावर भलंमोठं गेट आहे, ज्यावर लंडन पोलीस जागता पहारा देत असतात. असो.  बाकी रस्त्यावर अगदीच  तुरळक लोक दिसत होते.

तिथून मग आम्ही बसने ट्रॅफल्गार स्क्वेअर ला आलो. समोर मोठ्ठा चौक आणि त्या बाजूने गोलाकार वाहतूक चाललेली. आजुबाजुच्या चिंचोळ्या रस्त्यावर फूटपाथवरच्या पोलवर छान रंगीबिरंगी फुलांच्या कुंड्या लटकत होत्या. काळ्या पोलवर त्या फारच खुलून दिसत होत्या. तिथेच एका रेस्टॉरंट मध्ये आम्ही शिरलो. गच्च भरलेल्या त्या हॉटेलात लोक मित्रमंडळींबरोबर बिअर चा आस्वाद घेत मस्त मजा करत बसलेले. आम्हीही एका टेबलवर बसलो. पूर्ण जुन्या पद्धतीचं फर्निचरचं इंटिरियर असलेलं ते हॉटेल लंडनच्या परंपरेला साजेसंच वाटलं. आम्ही मग इंग्लिश पद्धतीचं जेवण घेतलं ज्यात ते टिपिकल बॉइल्ड एग, बीन्स, ब्रेड टोस्ट टोमॅटो असं सारं होतं. बीन्स गोड होते. वेगळं लागतं पण खाऊ शकतो. आम्ही हाफ फ्राईड ऑम्लेट मात्र घेतलं नाही. अर्थात बिअरही घेतलीच. बिल पाहून मात्र थोडी कळ येतेच पण इलाज नाही. आपण पर्यटक म्हणून काहीच दिवसांसाठी येतो त्यामुळं हे खर्च गृहीतच धरावे लागतात. !!!!

ट्रफल्गार स्क्वेअर च्या मधोमध नेल्सनस कॉलम हा उंच मिनार आहे. त्याच्या पायथ्याला चौथऱ्यावर चारी बाजूला चार सिंह बसलेले आहेत. त्या चौकात कुठलंसं फेअर लागलेलं. लोक चौकोनी तंबू लावून काही बाही विकत होते. अशियन फेस्ट होता कोणतासा त्यामुळं इंडिया,इजिप्त, पाकिस्तान ई देशांचे खाण्याचे स्टॉल पण लागलेले त्याचा खमंग वास उठलेला. बाकी हस्तकलेच्या वगैरे वास्तूंचे स्टॉल्स पण होते. संगीतच कार्यक्रमही चाललेला. वरच्या बाजूला कोणी इंग्लिश गिटार वाजवत होता. लोक आवडीनं ऐकत होते. त्याच्या समोर पैसे टाकत होते. स्वेअरच्या पार्शवभूमीवर त्यांचं ते प्रसिद्ध नॅशनल म्युझियम आहे. ते अर्थातच आम्ही नंतर पाहणार होतो. 

ट्रॅफल्गारच्या चौकात गोलाकार वाहतूक सुरु होती. फक्त नॅशनल म्युझियम च्या बाजूला ट्राफिक बंदी होती.इथे थोडा वेळ थांबून मग आम्ही तिथल्याच एका कमानीतून पल्याड निघालो बकिंगहॅम पॅलेस कडे !!!  कमानीतून दूरवर तो पॅलेस दिसत होता. दोन्ही बाजूला झाडांच्या कमानी आणि मध्ये विशाल लाल रस्ता, त्याच्या बाजूला फूटपाथ. एका बाजूला काही प्रशासकीय इमारती आणि दुसऱ्या बाजूला गार्डन. दार मधोमध दिसणारा बकिंगहॅम पॅलेस.. आपल्या राष्ट्रपति भवनहि याच धर्तीवर बांधलंय पण त्याच्या समोरचे ते प्रचंड विशाल रस्ते आणि टेकडीच्या टोकाला राष्ट्रपतीभवन … अभिमान वाटावा असंच  प्रचंड मोठं,  हे त्या मानाने लहान दिसतं आणि एकाच पातळीवरहि पण बाज तोच. असो हे अर्थात माझं निरीक्षण !!! 

आम्ही आता बकिंगहॅम पॅलेसच्या समोर पोहोचलो. छान ऊन पडलेलं त्यामुळं  त्याच्या समोर असलेला  सोनेरी व्हिक्टोरिया मेमोरियल उन्हात छान चमकत होतं. दोन्ही बाजूला सुंदर रंगीबिरंगी फुलांची नक्षी असलेली हिरवळ आणि मधून पॅलेस कडे जाणारा रास्ता. बकिंगहॅम पॅलेस हे राजघराण्याचं १८३७ पासून अधिकृत निवासस्थान. आताही राणी एलिझाबेथ तिच्या साऱ्या कुटुंब कबिल्यासह इथे राहते. म्हणजे आता या क्षणीही ती आतच आहे !! इथे ७७५ खोल्या आहेत ज्यामध्ये राजघराण्याच्या निवासासह त्यांच्या कर्मचारी वर्गाच्याही निवासाची सोय आहे. तसेच प्रशासनिक खोल्या, स्विमिंग टॅंक, सिनेमा गृह, ज्वेलरचं वर्कशॉप,पोस्ट ऑफीस आणि अगदी ऑपेरेशन थिएटरही आहे. तसेच विशाल गार्डन आहे. 

सध्याची राणी एलिझाबेथ हीचा जन्म २१ एप्रिल १९२६ ला झाला आणि ती १९५२ साली तिच्या वडिलांच्या निधनानंतर ती सम्राज्ञी झाली.  एक दंत कथा असलेली हि राणी सगळ्या जगात कायमच एक कुतूहलाचा विषय आहे. अतिशय प्रदीर्घ काळ ती या पदावर विराजमान आहे. राज्ञी पदाचा तो काटेरी मुकुट अतिशय अभिमानानं आणि कौशल्यानं सहजतेनं मिरवत आहे. त्यांचे ते राजशिष्टाचार पाळत असताना कुठेही काही चूक होऊ नये याची ती नेहेमीच खबरदारी घेताना दिसते. सामान्य माणसाला राग लोभ मत्सर दुःख सारं खुलेपणानं व्यक्त करता येतं पण या लोकांना ते स्वातंत्र्य नसतं. म्हणजे तसा तो सोनेरी पिंजराच जणू. काय, कुठं, किती, केव्हा बोलायचं तेही  सारं मोजूनपामून. कुठंही जराही तोल ढळता काम नये. नाहीतर सगळीकडे गवगवा होणार. राजघराण्याची इज्जत तर जाणारच त्याच बरोबर इंग्लंडचीही इज्जत जाणार हे तत्व ती इतके वर्ष लीलया पाळत आलीये. कधीच कुठल्या वादात अडकलेली दिसली नाहीये. अगदी अलीकडे प्रिन्सेस डायनाच्या बाबतीतला तिचा संयम तर वाखाणण्याजोगाच. त्यावेळी  राजघराण्यावर कित्येक आरोप झाले पण तीने कसलीच प्रतिक्रिया दिली नाही. सारं मनात ठेवलं. कित्ती अवघड असेल ते. पण तरीही कायम हसतमुख आणि मोहक अशी हि राणी जीचा दबदबा जाणवतो. या वयात अजूनही ती जगभरातल्या देशाच्या प्रमुखांना भेटते. त्यांचे स्वागत करते, त्यांना मेजवानी देते. आताही अतिशय फिट असणारी हि राणी साऱ्या ब्रिटिश लोकांसाठी अभिमानाचा विषय आहे. इंग्लिश लोकांना त्यांचं राजघराणं अतिप्रिय आहे. त्याबद्दल ते हळवे आहेत. त्यांच्या विषयी चर्चा करणं त्यांना आवडतं. अशा या परंपरा प्रिय देशाचं नेतृत्व ती सक्षमपणे करतेय. त्यामुळेच ती जिवंतपणीच एक दंतकथा बनून राहिलीये. 

पॅलेसच्या मुख्य दरवाजासमोर दोन बॉबी उभे होते. त्यांची ती उंच फरची काळी टोपी. लाल स्कर्ट आणि हातात भाला., अगदी स्तब्ध उभे होते ते, आलेले लोक त्यांचे फोटो काढत होते. मला क्षणभर प्रश्न पडला कि हे खरे आहेत कि पुतळे? पण थोड्याच वेळात त्या दरवाज्यातून कुठलीशी गाडी बाहेर पडली आणि हे हालले इकडून तिकडे गेले. जागांची अदलाबदल केली आणि पुन्हा पुतळे बनले. त्यावेळी आपणही इतिहासात गेल्याचा भास झाला. खरंतर इथला चेंजिंग ऑफ गार्डस सोहळा अगदी पाहण्यासारखा असतो पण आमची वेळ चुकली आणि आम्हाला तो पाहता आला नाही.  तिकडेच थोडं फिरून मग आम्ही परत निघालो. वाटेत थोडा वेळ बागेत बसलो. कॉफी पिली आणि तिकडेच असलेल्या वॉशरूम ला गेलो. चांगले एक पौंड म्हणजे साधारण ९० रुपये फी भरून कार्यक्रम उरकला. 

तिथून बसने व्हिक्टोरिया स्टेशन ला आलो आणि तिथून ट्रेन बदलत शेवटी बसने आमच्या विश्रामाच्या ठिकाणी पोहोचलो. रात्रीचे ९.३० -१० वाजलेले पण झक्क ऊन होतं अजून. कधी एकदा अंथरूणावर पडतो असं झालेलं. पायाची वाट लागलेली. 

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

5 comments