• Menu
  • Menu

भाग-८: ऑस्ट्रियाच्या वाटेवर …. !

सकाळी नेहमीप्रमाणे पहाटे जाग आली. सामानाची आवराआवर करून चहा घेतला. मग नाश्त्यासाठी काल आणलेला काल आणलेला ब्रेड तव्यावर थोडे बटर लावून परतून घेतला. गाडीत खायला उपयोगी पडतं सोबत शेंगदाण्याची चटणी बरोबर असली की झालं. 

आमचा ओनर बरोबर 07:40 ला आला. आमची बस साडेआठची होती.  मग आम्ही निघालो. तोही आमच्या सोबत थोडं सामान ढकलू  लागला. खरंच चांगला होता बिचारा. मग त्याने आम्हाला ट्रामचे तिकीट कुठे मिळते ते दाखवलं. आम्ही तिकिटे काढली आणि पाचच मिनिटात ट्राम आली आम्हाला गाडीत बसवून तो बाय करून गेला. खरंतर काहीच नातं नव्हतं त्याचं आणि आमचं पण तरीही कित्ती मनापासून अगदी नातेवाईक असल्यासारखा आम्हाला सोडायला आला आणि बाय करून गेला.

ट्रामला सकाळी ऑफिसला जाणाऱ्या लोकांची गर्दी होती.

पाचच मिनिटात आम्ही बस स्टेशन ला पोहोचलो. आमच्या बस बे ला येऊन थांबलो.

तेवढ्यात माझा नवरा खायला काहीतरी घेऊन आला,”आहे ना आपल्याकडे? तेच खाल्लं असतं ना? वाटेत कुठेतरी बस थांबेल तेव्हा नाश्ता करून घेऊ.” मी त्याला म्हटलं.

पण मग आम्ही तिकडेच त्याने आणलेला तो पिझ्झा खाऊन घेतला.थोड्यावेळाने आमची बस आली. बस डबलडेकर होती. वा मस्तच! त्याला विचारलं कुठे बसू? तर म्हणाला कुठेही बसू शकता मग काय मी पटकन वरती जाऊन अगदी समोरची सीट पकडून बसले. अशी सुवर्णसंधी कशाला सोडायची? बस मध्ये विमानात असते तसे टॉयलेट होते. मस्त ,प्रशस्त आणि आरामदायक होती बस. मध्ये आमने-सामने सीटपण   होत्या. प्रवासी राजाच्या सोयीचं सगळं काही. बस निघाली. एवढी मोठी  बस खाली वर असलेली. पण बसमध्ये जेमतेम वीस-बावीस लोक.

वरच्या सीटवरून सगळं अगदी स्पष्टच आणि दूरपर्यंत दिसत होतं. बस मध्ये वायफाय पण होता. त्यामुळे प्रवास मस्त होणार होता. सगळ्या शहरातून फिरत बस  निघाली त्यामुळं शहराचा न  बघितलेला भागही आता  पाहायला मिळत होता. गुरुवारचा दिवस असल्याने अर्थातच रस्त्यावर गाड्यांची गर्दी होती. ऑफिसला, कामाला जाणाऱ्या लोकांची घाई सगळीकडे पाहायला मिळत होती. दूरवर रहिवासी बिल्डिंग्ज दिसत होत्या. साधारण सात-आठ लाख वस्तीचं अतिशय सुंदर असं हे शहर. पुन्हा इथं कधी यायला मिळेल असं सहजच वाटून गेलं. क्रोएशियाची ट्रिप तर छानच झाली. खूप काही पाहिलं, पण बरंच काही पाहायचं राहून गेल्याची हुरहूर होतीच.  विशेषतः झादर हे ठिकाण, या गावचा समुद्रकिनाऱ्यावर बांधलेला अनोखा पियानो दिवसा सूर्य उर्जेवर चार्ज  होतो आणि रात्री समुद्राच्या लाटांच्या पाण्याने वाजतो. ते पाहायचं, ऐकायच राहिल. तसंच इस्त्रिया या गावात जगातला सर्वात सुंदर सुर्यास्त दिसतो म्हणे तोही पाहायचा राहून गेला. क्रकाचे धबधबे आणि पाण्यात डुबायचं उभे राहून गेलं. अर्थात काहीच न बघण्यापेक्षा खूप काही बघितलं, अनुभवलं. एक नवा देश पाहायला मिळाला. मुख्य म्हणजे तो आम्हाला अतिशय आवडला. सगळीच ठिकाणं पाहणं शक्यच नसतं हेही खरंच.

शहर पार करून आम्ही हायवेला लागलो. दूरवर अधून मधून छोटी छोटी घरं,शेती,गावं दिसत होती. घराच्या भोवती शेती, कोंबडी वा कुत्र्यासाठी छोटंसं खुराडंवजा शेड, असं अधून मधून दिसत होतं. सरसकट दूरवर पसरलेली शेती आणि मागं जंगल, डोंगर असं दृश्य. मध्येच एक गाव लागलं. रेल्वेरूळ आणि त्यावर धावणारी दोनच डब्यांची ट्रेन अगदी खेळण्यातल्या सारखी दिसत होती. आपल्याकडं लांब लचक रेल्ववे पाहून सवय त्यामुळं अशी छोटीशी ट्रेन पहिली कि मजा वाटते खरी.

आम्ही आता क्रोएशिया आणि स्लोव्हेनियाच्या  बॉर्डर जवळ आलो. ऑस्ट्रीयात प्रवेश करण्यापूर्वी हा देश आम्हाला ओलांडायचा होता. त्यामुळे अनायासेच एक देशही दुरूनच का होईना पाहायला मिळणार होता. काही वर्षापुर्वीपर्यंत हाही क्रोएशिया सारखाच युगोस्लाव्हिया या देशाचा भाग असलेला. स्लोव्हेनिया हा त्यांच्यातला  सर्वात सधन असलेला देश. त्यानंतर अर्थातच क्रोएशियाचा नंबर लागतो. आता आम्ही क्रोएशियाच्या चेक पोस्टला आलो. आम्हाला सर्वाना खाली उतरून रांग लावावी लागली. आमच्या पासपोर्ट वर क्रोएशिया सोडल्याचा स्टॅम्प मारला. आता आम्ही क्रोएशियाला ऑफिशिअली अल्वविदा केलं. मग आम्ही थोडं पुढे जाऊन थांबलो. मागून आमची बस आली आणि मग त्यात आम्ही बसलो पुन्हा बसलो. पुढे काही अंतरावर आता स्लोवेनियाचा चेक पोस्ट आला. आता पुन्हा आमची वरात निघाली. आता समोरच्या पोलीसाने आम्हाला कुठून आलात कुठे निघालात वगैरे प्रश्न विचारले. स्टॅम्प मारला. असाच कार्यक्रम अजून एकदा करायचा होता. हाही एक वेगळा अनुभव.

स्लोवेनियाच्या  हद्दीत रस्त्याचे काम चाललेले त्यामुळे एका बाजूचा रस्ता बंद होता. एकाच बाजूने सगळी वाहतूक चालू होती. पण सारं व्यवस्थित चाललेलं होतं, शिस्तीत. मन सतत तुलना करत राहतं! इलाज नाही, असो. इथेही तशीच तीव्र उतारावरची शेती, तसलीच घरं आणि गावं दिसत होती. फार फरक वाटला नाही कारण काही वर्षांपूर्वी पर्यंत ते एकच असल्यामुळं असेल कदाचित. थोड्याच वेळात ड्रावोग्राड हे स्लोव्हेनियातल एक शहर लागलं.  सकाळचे साधारण साडेदहा वाजले होते. गाडी आतापर्यंत कुठेही न थांबता आलेली. आम्हाला वाटलं आता तरी तो कुठेतरी रेस्टॉरंटमध्ये घेऊन जाईल चहापाण्यासाठी किंवा स्टॅन्डवरच जास्त वेळ  थांबेल. काय पण कसंच काय! प्रवाशांची चढ-उतार करून बस लगेच निघाली.

इथे पाऊस पडून गेलेला दिसत होता. रस्ते ओले होते. आभाळही ढगाळ होतं. समोर एक मॉल दिसत होता. तिथे खाली रेस्टॉरंटमध्ये लोक दिसत होते. रस्त्यावर मात्र  फारशी रहदारी नव्हती. शांत  होतं सर. शहरातून बाहेर पडलो. हायवेवर बाइकर्स दिसले. मजेशीर बाईक्स होत्या त्यामुळे लक्ष वेधून घेत होत्या. समोर दोन चाकं आणि मागे एक चाक अशा.

डोंगरावर द्राक्षाची शेती दिसत होती. उतारावर लावलेले द्राक्षाचे मांडव उंचावर घरंही दिसत होती झाडात लपलेली. थोड्याच वेळात आम्ही ऑस्ट्रियाच्या हद्दीत प्रवेश केला. इथे मात्र आम्हाला खाली उतरावे लागले नाही.  त्यांची महिला पोलीस येऊन गाडीतच पासपोर्ट चेक करून गेली. रस्त्यावरती आता दोन्ही बाजूला झाडांच्या उंचच्या उंच भिंती दिसत होत्या. त्यामुळे पलीकडची गावं वगैरे काहीच दिसत नव्हतं. आम्ही वरच्या मजल्यावरती बसलो असल्यामुळे आम्हाला थोडफार दिसत तरी होतं. अन्यथा कंटाळवाणंच झालं असतं.

बाहेर आता पावसाला सुरुवात झाली. रिमझिम पाऊस पडत होता.  दूरवर गर्द राई दिसत होती. हायवेला आता उंच भिंती दिसत होत्या. टेकड्यांवर आणि खाली  शेती आणि रंगीबेरंगी घरंही छान दिसत होती. रस्ता आता घाटातून चालला होता. खाली एक मोठं गाव लागलं. बहुतेक  घरांच्या भवताली हिरवळ,  गार्डन, मुलांना खेळायला छान छान झुले, जम्पिंग नेट, कुठे स्विमिंग टँक असं दिसत होत. प्रत्येक घरात काही ना काही असेच. दुमजली बंगले वरून दिसत होते. कौलारू छपरांची पण रंगीबेरंगी भिंतीचे वा पांढरे काळे बंगले. अर्थातच हे सारं आम्ही वर बसल्यामुळं दिसत होतं, अन्यथा असं काही आहे खाली हेही कळलं नसतं हेच खरं. क्वचित वळणावर समोर एखादं मोठठं गाव दिसायचं, वाटायचं कि या गावातून जाईल बस पण गावाला वळसा मरून बस बाहेरच्या बाहेर निघून जात असे. त्यामुळं ऑस्ट्रियातल गाव असं काही लागलंच नाही प्रवासात.

आता रस्ता खूप मोठा झाला. चांगला आठ पदरी हायवे. ऑस्ट्रियातले हायवे हे जगातल्या काही सर्वोत्कृष्ट हायवे पैकी एक आहेत असं म्हणतात. अतिशय सधन असलेल्या या देशात ते साहजिकच आहे म्हणा. दोन्ही बाजूला भिंती आणि मोठाले आठ पदरी हायवे. गाड्या सुसाट धावत होत्या. सगळ्या आलिशान मोटारी. बाकी क्वचित जिथे भिंत नव्हती तिथे सपाट प्रदेशात दूरवर नजर जाईल तिथवर शेती दिसत होती. बहुदा गव्हाची असावी. थोड्याच वेळात आम्ही व्हिएन्नात  प्रवेश केला. आता रस्त्याच्या बाजूच्या भिंतीनी छान रंगीबेरंगी रंग परिधान केला.  हिरव्या, गुलाबी,पिवळ्या अशा सुंदर रंगात नटलेल्या भिंतीनी आमचं स्वागत केलं.

गावाच्या बाहेर आयकिया सारखी मोठाली दुकानं दिसत होती. जमलं तर इकडे आम्हाला चक्कर मारायची असं ठरवलं. साधारण पंधरा वीस मिनिटात आमची  बस स्टॅन्डला पोहोचली. तिकडे उतरून आधी आमच्या ओनरला फोन केला. कुठल्या बसने व ट्रेनने, कुठे आणि कसं यायचं ते तिला विचारलं.  इथून टॅक्सी करणं अवघड दिसत होतं.  कारण टॅक्सी क्रेडिट कार्ड वरून पैसे घेत नव्हता. फक्त पेपाल चालतं असं म्हणत होतं ते अँप. त्यामुळं  पंचाईत झाली. तर तिने सांगितल्याप्रमाणे ट्रेन ने जायचे ठरवल. म्हणून मग सामान ढकलत गूगल मॅप प्रमाणे स्टेशन शोधत निघालो. पण थोडे अंतर गेल्यावरही स्टेशनच्या काही खाणाखुणा दिसेनात त्यामुळे कोणालातरी विचारायचं  ठरवलं पण रस्त्यावरहि माणसे ही दिसेनात. शेवटी दिसला एक माणूस, त्याला विचारले त्याने उलट दिशा दाखवली. आम्ही परत बस स्टॅन्ड लाच आलो. तिथे समोरच एक लिफ्ट होती आणि त्यातून वरती गेल्यावर रस्त्यावरच्या ब्रिजवरून पल्याड रेल्वे स्टेशन होत. काखेत कळसा नि गावाला वळसा असा प्रकार झाला होता. अर्थात गूगलनेही गंडवलच होतं, कि गूगलच गंडलं होतं ते नाही कळलं.

वर गेल्यावर ट्रेनची  तिकीट काढली आणि खाली येऊन बसलो. तिने सांगितलेल्या ट्रेनमध्ये चढलो आणि तिने सांगितलेल्या स्टेशन वरती उतरलो. बाहेर  येऊन पुन्हा बॅगा ढकलत ढकलत  निघालो. पाच मिनिटावर घर आहे म्हणाली होती. पण आम्ही गेले पंधरा मिनिटे चालत होतो. रस्त्यावरती माणसं अभावानेच दिसत होती.  गाड्याही फारशा दिसत नव्हत्या. कदाचित दुपारची वेळ असल्यामुळे असेल. साधारण वीसेक मिनिटांनी आम्ही घराकडे आलो. खालून तिला फोन केल्यावर तिने वरूनच त्या मोठ्या दरवाजा तला एक झरोखा उघडला. हे आपल्या पुर्वीच्या वाड्याला असायचं तसंच, मोठ्या दरवाजाला असलेला छोटासा दरवाजा! त्यातून आम्ही आत गेलो.  थोडं पुढं  दोन चार पायऱ्या चढल्यावर ती लिफ्ट होती. पाचव्या मजल्यावर आमचं घर होतं. तिकडे आल्यावर ती आणि तिची बहीण आमची वाटच बघत होते. त्यांनी घर उघडून दिलं. कुठे काय आहे ते सांगितल आणि काही लागलं तर बाजूच्या घराची बेल दाबा, आम्ही इथेच राहतो असं सांगून त्या  गेल्या.

आम्ही घर पाहू लागलो, दरवाजाच्या डाव्या कोपर्‍याला स्टैंडवरती रेनकोट वगैरे लावायची सोय होती. तिकडे छत्री पण ठेवलेली. बाजूच्या कपाटांमध्ये एका कप्प्यात सोफ्ट टॉईज,  बूट, स्कीईंग, स्केटिंग बूट वगैरे असं सामान गच्च भरून ठेवलेलं होत. एका कप्प्यात आमच्यासाठी नॅपकिन्स वगैरे ठेवलेले होते. कॉरिडॉरमध्ये भिंतीवर सुंदर चित्र लावलेली होती. कॉरिडॉरच्या दुसऱ्या बाजूला टॉयलेट आणि बाथरूम असं वेगवेगळं होत. हॉलमध्ये प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला एक लाकडाचं मोठ्ठ शोकेस होतं त्यात खूपशी स्टेशनरी, पुस्तकं असं बरंच काही भरलेलं होतं. त्याच्या बाजूला एका मोठ्याशा टेबलवर कम्प्युटर ठेवलेला. तिकडेच काही ऑस्ट्रिया आणि व्हिएन्ना शी संबंधित माहिती पुस्तके ठेवलेली होती. तिथून पुढे कोपऱ्यात एका मोठ्या कुंडीत आर्टिफिशियल प्लांट  ठेवलेला होता. बाजूची भिंत रस्त्याच्या बाजूला होती. तिकडे पूर्ण खिडक्या होत्या. पांढऱ्या रंगाच्या खिडक्या. त्याला लावलेले होते ब्लाइंड आणि पांढऱ्याच रंगाचे चिकनचे पडदे. एका कोपऱ्यात सोफा त्याच्या चेअर्स आणि अजून एक अँटिक सोफा आणि त्याच्या खुर्च्या मध्ये एक लाकडाचं कॉफी टेबल, मग पुन्हा एका स्टॅण्डवर दोन सिरॅमिकच्या कुंड्यांमध्ये आर्टिफिशियल झाडे लावलेली होती.  त्याच्या बाजूला डबल बेड आणि त्याच्या कोपऱ्यात एक उंच लॅम्प आणि खाली पपेरस्टँड. त्याच्या बाजूला किचन होत. किचनमध्ये काही भांडी फ्रिज ,गॅस डिश वॉशर, कॉफी मेकर असं बरंच काही होतं .. हॉलमध्येच एक गोल डायनिंग टेबल लावलेला होता.  त्याच्या बाजूला चार खुर्च्या ठेवल्या होत्या. हुश्श !!!!किती सामान होतं बापरे! आमचं सामान आल्यावर खोली गच्च भरून गेली. मध्ये फिरायला जेमतेमच जागा होती. असो.

आम्ही थोडा आराम करून खाली असलेल्या सुपर मार्केटमध्ये जायचं ठरवलं, कारण चार दिवस इथं राहणार  असल्यामुळे आम्हाला बरंच काही सामान आणायचं होतं. भाजी, फळं, दूध, ब्रेड,अंडी असे एकदाच आणून ठेवलं की चार दिवस पुन्हा बघायचं काम नाही. थोडं खाऊन आणि आवरून पुन्हा आम्ही खाली निघालो. सुपर मार्केटमध्ये ब्रेडच्या खूप व्हरायटीज होत्या. फळंही खूप प्रकारची होती आणि अर्थातच बीअरच्याही नाना व्हरायटीज होत्याच. नॉनव्हेज सेक्शनमध्ये आम्ही चिकन घ्यायचं ठरवलं, पण सगळे पॅक एक किलोचे किंवा जास्त. एवढा  मोठा पॅक आम्हाला दोघांना खूपच जास्त होणार होता.  छोटे छोटे पॅक मध्ये तिथे वस्तू मिळत नाहीत.  सगळे मोठे मोठे पॅकच. पण पुढे फ्रिजर सेक्शन मध्ये मला कोळंबी दिसली.  खूपच आनंद झाला मग तेच घेतले. बाकी द्राक्ष, बेरीज, थोडी केळी, अंडी, दूध आणि ब्रेड घेऊन आम्ही काउंटरला आलो तर तिकडे बॅग साठी दीड युरो म्हणाला. बापरे! मग  सामान बाजूला घेऊन मी थांबले आणि माझा नवरा परत घरी जाऊन एक पिशवी घेऊन आला. मग आम्ही बिल करून सामान घेऊन आलो.

आल्यावर आधी झक्कपैकी ताज्या दुधाचा चहा केला. मग अर्धा-पाऊण तासाने बाहेर पडलो. कडकडीत ऊन होते बाहेर अजून. साडेपाच सहा वाजलेले.  आजूबाजूला काय काय आहे, उद्या कसं जायचं ते बघायचं होतंच. पण आताही जमलं तर आजूबाजूला काही आहे तर तेही पाहून यायचं ठरवलं. बस ,ट्राम, ट्रेन कुठे आहेत ते पाहून घेतलं. मग रमत-गमत त्याच रस्त्याने पुढे चाललो. पुढे मोठा चौक आला. त्याच्या पल्याड एक नदी वाहत होती. त्या ब्रिज पाशी आलो.  नदीच्या दोन्ही बाजूला छान घाट बांधलेले होते. त्या वॉकवे वरून लोक जॉगिंग करत होते. बाजूला सुंदर झाडे लावलेली किनार आणि स्वच्छ पाणी. ही डेन्युबची एक उपनदी होती. पण भरपूर पाणी वहात होत. लोक मुलाबाळांचा फिरताना दिसत होते.

तिथून थोडे पुढे गेल्यावर ती गार्डन लागली. गार्डन मोठ्ठ दिसत होतं  खूप लोक मुलाबाळांसह मित्रपरिवारासह फिरत  होते. गप्पा मारत लॉनवर बसलेले.  काही जॉगिंग करत होते.  तर कोणी खात बसलेले होते. कोणी सायकलिंग करत होत. लहान मुलेही सायकलिंग करत होती.  तसेच पुढे आलो काही रहिवासी बिल्डिंग दिसत होत्या. त्यामध्ये एक ते इंटरनॅशनल स्कूल ही दिसली.  दूरवर चर्चची घंटा ऐकू येत होती आणि एक मेरी गो राउंड ही दिसत होतं, त्या दिशेने चालायला सुरुवात केली. मगाशीचीच गार्डन बहुदा इकडेही दिसत होतं. तिकडे जत्रा भरलेली दिसली. काय नव्हतं तिकडे, सगळं काही आपल्याकडे असतं तसंच इंद्रधनुषी पाळणा, आकाशपाळणा, गोल गोल फिरणाऱ्या गाड्यांची धमाल, एकावर एक आदळत जाणाऱ्या गो कार्ट, भुताचा महाल वेड्यावाकड्या आरशांचं दालन, सारं काही !!! व्हिएन्नाची जत्रा अशी अवचितच पाहायला मिळाली. कदाचित कायमची मुलांची बागही असेल म्हणा,  लहान मुलांना त्यांचे आईबाप खेळवून घालत होते. काही किशोरवयीन मुलामुलींचे जथ्थे,  बुड्डी का बाल, आईस्क्रीम पॉपकॉर्न  खात इकडे तिकडे खिदळत फिरत होते. खेळांचे मालक, कर्मचारी लोकांना येण्याचं,  खेळण्याच आव्हान करत होते. जोरात ओरडून सांगत होते.  झकपक लागणारे दिवे, रंगबिरंगी लायटिंग, मिकी माऊस सारं काही अगदी जिवंत वातावरण. तिथे मनसोक्त भटकून आम्ही परत निघालो. घरापासून बरेच  दूर आलेलो होतो पण जाताना कोणती बस वा ट्राम घ्यायची ते माहीत नव्हतं.  त्यामुळे चालतच परत निघालो. आठ सव्वा आठ झालेले, पण अजूनही चांगलंच ऊन होतं . साधारण अर्धा-पाऊण तास चालल्यावर घर आलं. घरी आल्यावर मस्त कोळंबी घालून खिचडी केली आणि टमाट्याच्या रश्यासोबत खाल्ली. खूप दिवसांनी कोळंबी खायला मिळालेली त्यामुळं मन तृप्त झालं.

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *