• Menu
  • Menu

भाग-४: नितांत सुंदर स्प्लीट

सकाळी लवकर उठलो बॅगा वगैरे भरून ठेवल्या,  नाश्ता केला आणि सगळं आवरून ठेवल. आमच्या ओनरची  वाट पाहत बसलो. तो बरोबर साडे आठ ला आला.म्हणाला इथून ट्राम पण जाते बस स्टँडला किंवा आपण चालतही जाऊ शकतो,  दहा पंधरा मिनिट लागतात. तशीही ट्राम येऊन तिथे पोहोचायला तेवढाच वेळ लागेल.  तुम्ही म्हणत असाल तर मी येतो तुम्हाला सोडायला.  आम्हाला आनंदच  झाला.  नाहि तरी भारतात असं सामान ढकलत बस स्टेशन  पर्यंत पोहोचणे शक्य नाही.  तर म्हटलं हाही अनुभव घेऊन बघू.  मग आम्ही मस्त आमचे लगेज ढकलत चाललो. त्यांनेही एक बॅग  घेतली ढकलायला. चांगला होता बिचारा आणि गप्पिष्टही !!. रस्त्यावर अगदी तुरळक लोक होते.  काही लोक ऑफिसला जायला लगबगीन निघाले होते. काही ट्रामची वाट पाहत उभे होते.

जरा पुढे गेलो डाव्या बाजूला त्यांचा फेमस डोल्याक मार्केट लागलं.  खूप सारे विक्रेते भाजी,फळं, फुलं असं  स्टॉल लावून विकत होते.  बरेचसे लोक खरेदी करत होते. खूप मोह होत होता आत जाऊन पाहण्याचा आणि ती लालचुटुक चेरी दुरूनच खुणावत होती.  ती घेण्याचाही !! सुंदर फुलं पण आकर्षित करत होती पण आता आम्हाला वेळ नव्हता.  बस पकडायची होती आणि हातात सामान पण होतं  त्यामुळे नुसत लांबूनच मार्केटचं दर्शन घेतलं आणि  सामान ढकलत इकडे तिकडे पहात चालू लागलो.  रस्त्याच्या दुतर्फा सलग ५-६ मजली इमारती दिसत होत्या. पण काही मात्र बाहेरून पोपडे उडालेल्या होत्या. आम्ही रहात असलेल्या  जागीही अशाच काही  सिमेंट निघालेल्या इमारती होत्या म्हणा.  पण आतून चकाचक!!! मात्र बाहेरच्या रंगरुपावरुन त्यावर खर्च करत नसावेत असं वाटलं.  असो.  पुढे एक माणूस कचऱ्याच्या डब्यात काहीतरी शोधत होता. कोल्ड ड्रिंक ,बिअर चे रिकामे टीन्स सापडतील ते त्याच्या जवळच्या झोळीत टाकून पुढे जात होता.  सगळीकडे भिकारी किंवा गरीब लोक असतातच. देश गरीब असो वा श्रीमंत, संख्या फक्त कमी जास्त  इतकंच

आम्ही पंधरा वीस मिनिटात बसस्टेशन ला आलो. बऱ्यापैकी मोठा होता. त्याच्या बाहेरच ट्राम चं स्टेशन पण होत.  आम्ही आत गेलो.  तिकडे सगळ्या बस या प्रायव्हेट असल्यामुळे प्रत्येक कंपनीसाठी वेगळे स्लॉट ठेवलेले.  त्यात आमच्या स्लॉट ला जाऊन थांबलो.  आम्हाला बाय करून आमचा ओनर गेला. अगदी नातेवाईकच सोडायला आल्या सारखं वाटलं.  बस लागलेलीच होती.  लगेजचे काही एक्स्ट्रा पैसे द्यावे लागले.  आम्ही आमच्या सीटवर बसलो.  आजूबाजूला काही लोक बसलेले.  अजून काही येत होते.  इतक्यात एक टिन एजर्सचा घोळका हसत-खेळत गाडीत शिरला.  13- 14 वर्षांची  मुलं  मुली जोरजोरात एकमेकांची थट्टा मस्करी करत होते.

गाडीचा ड्रायव्हर आणि कंडक्टर दोघेही पांढरे युनिफॉर्म घालून होते. क्रोएशिया हा बऱ्यापैकी समृद्ध देश  असल्याचं पदोपदी जाणवत होतं.  त्यांचे रस्ते, ट्राम, गार्डन शहरात रस्त्याच्या मधोमध जपलेली सुंदर फुलं  आणि  हिरवीगार हिरवळ सगळं कसं छान मेंटेन केलेले.  दर माणशी उत्पन्न चांगलं आहे त्यांचं,  त्यामुळे राहणीमानही उच्च आह.  सर्वसाधारण लोक हे आपल्या उच्च मध्यमवर्गीयांसारखे असतात.  सगळा मामला ब्रँडेड आणि  उत्तम दर्जाच्या.वस्तूंचा उगाच रस्ते का माल सस्ते में किंवा चायनीज मामला नाही.

 बस आता पूर्ण भरली. थोड्याच वेळात गाडी हायवेला लागली. कालचाच रस्ता होता.  त्या टीनेजर्सचा  चिवचिवाट चालू होता. थोड्या वेळानंतर तो बंद झाला.  बहुदा झोपी गेली असावीत मंडळी.  सुंदर रस्त्यावरून बस धावत होती.  वाहतूक अतिशय  शिस्तीत कोणीही ओव्हरटेक करण्यासाठी कर्णकर्कश हॉर्न वाजवत नव्हतं . अर्थात तसा आम्ही संपूर्ण ट्रीप मध्ये हॉर्न  कधीच ऐकला नाही पोलीसच्या गाडीशिवाय. डाव्या बाजूने ओव्हर टेक करून गाड्या परत समोर येत.  आपल्यासारखं ओव्हरटेक केल्यावरही मी त्याच लाईनीत बुंगाट जाणार असा माजकोट मामला नव्हता.  त्यामुळे डावी बाजू पूर्ण रिकामी होती. फक्त ओव्हरटेकिंग साठीच. मध्ये बरेच बोगदे ही लागले.  तिथे मात्र दुहेरीचे वाहतूक होती. म्हणजे एक जाणारी आणि एक येणारी , पण तरीही शिस्तीत सारं चाललेलं. कुठेही ट्राफिक जामची वगैरे भानगड नाही. शिस्तीचा फायदा सर्वानाच होतो.  अपघात होत नाहीत,  वेळ वाचतो आणि इंधन वाजतेच पण ड्रायविंग करताना ताणही येत नाही. आपल्याकडे कोण, कुठे, कधी, कसे घुसेल हे ब्रह्मदेवाच्या बापालाही कळणार नाही. शिस्तीचं महत्व आपल्याला कधी कळणार देव जाणे.

छान डोंगरातून, घाटातून ,जंगलातून रस्ता जात होता.  दूर पर्वतावर अजून टोकाला हिमनग दिसत होते.  मागच्या वर्षी इथं प्रचंड बर्फ पडला असं आमचा कालचा गाईड म्हणाला होता,ते उन्हात चमकत होते. थोड्या वेळानं गाडी एका रेस्टारंटपाशी थांबली. तिथे समोर काचेत बरेच पदार्थ ठेवलेले होते.  एक जरा वेगळा पदार्थ दिसला, आपल्या उडीद वड्यासारखा दिसत होता.  नाव  विसरले मी, पण तेच घेतलं कारण वेगळं वाटत होतं.  त्यात नमकीन आणि मीठा असे दोन प्रकार होते.  आम्ही नमकीन घेतला. ते पॅक करून घेतलं. कारण बस फार वेळ थांबणार नव्हती. उगाच आपल्यामुळे थांबायला नको.  त्यांना आपण वेंधळे वाटणार आणि इंडियन असेच असा शिक्का बसणार. परदेशात हे फार जपावं लागतं, तिथे आपण फक्त इंडियन असतो. त्यामुळं सतत हा विचार असतोच. देशाची इज्जत आपण घालवू नये, हि जबाबदारी असतेच. बसमध्ये बसून ते खायला घेतला तर बापरे त्यात पचपच तेल  होत. ते आधी टिश्यूला दाबून घेतलं आणि मगच खाल्ला. एकच खाऊन बाकीचे तसेच ठेवून दिले, हिम्मतच झाली नाही खायची!!!  तीन-चार तसेच ठेवले.  बस पंधरा मिनिटातच निघाली.

डोंगराचा रंग आता बदलला.  पांढऱ्या रंगाचे दगड धोंडे असलेले आणि झुडपे असलेले डोंगर सुरू झाले.  दूरवर दिसणाऱ्या पांढऱ्या फुलांचे ताटवे मोठे मोहक दिसत होते. तर काही ठिकाणी दूरवर जांभळट लाल रंगाच्या रांगा दिसत होत्या.  हे वाळलेल्या किंवा पानगळ झालेल्या झुडपांचे रंग दिसत होते. आत्ता लक्षात आलं  विमानातूनही दिसत होते ते मला. मध्ये छान निळाशार पाण्याचा तलाव किंवा नदी असावी,  दूरवर दिसत होतं. त्या दगडातही चांगली झाडी झुडपं दिसत होती. नवलाचंच वाटत होत

आता आम्हाला स्प्लिटची ओढ लागलेली.  थोड्याच वेळात त्याचे दर्शन झाले. निळ्याशार समुद्राच्या पार्श्वभूमीवर लाल छपरांची टुमदार घरं दिसत होती.  मध्ये मध्ये हिरव्या रंगाची नक्षी होतीच.  सुंदर फुलांच्या ताटव्यांनी हिरवळीने नटलेली  ट्रॅफिक बेटं  आमच्या स्वागतासाठी होती. शहरातून जात बस स्टेशनला आली. ते पोर्टवरच  होतं. म्हणजे रस्त्याच्या एका बाजूला पोर्ट आणि दुसऱ्या बाजूला बस स्टॅन्ड  मध्ये आणि स्टँडच्या मागे रेल्वे स्टेशन. असा सारा मामला.

आमच्या इथल्या ओनरचे वडील आम्हाला न्यायला आलेले.  आज ती कुठेतरी ऑफिसर टूर वर  गेलेली म्हणून ते घ्यायला आलेले. उंच धिप्पाड व्यक्तिमत्व. आम्ही गाडीत सामान ठेऊन निघालो.  वाटेत ते आम्हाला काही खाणाखुणा , रस्ते , महत्वाची ठिकाणं दाखवत होते.  थोड्यावेळातच घराजवळ आलो.  ते म्हणाले,” मी तुम्हाला इथला बीच दाखवतो, म्हणजे तुम्हाला कधीही तिथे जाता येईल.”चौकातून गाडी वळवून काही अंतरावर त्यांनी उभी केली. पुढे गाडी जात नसल्यामुळे तिथेच पार्क  केली. साधारण एक फर्लांगभर अंतरावर समुद्र होता. एका बाजूला एक नाली जात होती.  त्याच्या बाजूला पायवाट होती. अगदी आपल्या कोकणातल्या गल्ली सारखं.  त्या नालीच पाणी  छान स्वच्छ होतं.  काही लोक समुद्रावरून परतत होते,  काही समुद्रावर चालले होते.  आम्ही दहा मिनिटात तिथे पोहोचलो. समोर एड्रियाटिक सी शांत पहुडला होता.  आम्ही परत निघालो.  घरी पोहोचलो रस्त्यावर असलेला तीन मजली मोठा बंगला होता.  रस्त्यावर गाडी लावून सामान घेऊन आम्ही निघालो.  गेटला कुलूप लावलेले होते, उघडून खाली आठ-दहा पायऱ्या उतरून खाली आलो. समोरच आमचं अपार्टमेंट होत. दरवाजा उघडून आम्ही आत आलो.  त्यांनी आम्हाला सर्व कुठे काय आहे ते दाखवलं आणि काही लागलं तर फोन करा लगेच येईल म्हणाला. ते लोक वरच राहत होते.

अप्रतिम असं अपार्टमेंट होत.  आत्ताच रिन्युएशन करून घेतलं होतं म्हणे.  आम्हीच  त्यांचे पहिले गेस्ट  होतो.  त्यामुळे भांडी, बाकीच्या सगळ्या गोष्टी नव्याकोऱ्या होत्या.  कपाट, डायनींग टेबल, वॉशिंग मशीन,टीव्ही,  बेड सोफा सारं सारं नवं कोरं! खूपच छान वाटत होतं.  कोणतीही गोष्ट पहिल्यांदा वापरायला मिळण्यासारखं सुख नाही. त्यात एक वेगळाच आनंद असतो

सगळ्या अपार्टमेंटला पांढरा रंग दिलेला.  खिडक्यांना पांढरे पडदे लावलेले.  पांढरेशुभ्र बेडशीट, पिलो कव्हर!! एक छोटेखानी हॉल कम किचन आणि एक बेडरूम होत. आम्ही सामान लावून घेतलं.  आता आम्हाला चार दिवस इथं राहायचं होतं. थोडं खाऊन चहा वगैरे केला आणि कपडे धुवायचं ठरवलं. कारण आल्यापासून ते धुतलेच नव्हते. आता धुतले तर उद्यापर्यंत छान वळतील म्हणून मग कपडे धुवायला मशीन लावायचा प्रयत्न केला तर कळेचना कस वापरायचं ते.  वर झाकण असलेलं मशीन उघडल्यावर आत जाळी दिसत होती. कुठे आणि कसे कपडे घालायचे त्यात तेच कळेना. पावडर कुठे  घालायची  काहीच कळत नव्हत. मग आमच्या ओनरच्या वडलांना विचारलं.  त्यालाहि काही कळेना. त्यांनं बायकोला फोन करून विचारलं. तिने सांगितलं कि  त्याचे वरचे दरवाजे उघडल्यावर जो ड्रम होता त्याला खटका होता तो दाबला कि तो ड्रम उघडायचा. कपडे घऊन पुन्हा तसाच बंद करायचा. मशीन लावायची हि नवीनच होती. बघावं ते नवलच!!!. आमच्या बेडरूमच्या बाहेर एक कपडे वाढवायचा स्टँड मी पाहिलेला.  त्यावर कपडे वाळत घातले.  बेडरूममध्ये अजून एक नवा कोरा स्टँड आणि चिमटे पण होते.  पण मी बाहेरच वाळत घातले.  थोडा आराम करून बाहेर जाण्याचा विचार होता.  आम्हाला परवा डुब्रोनिकला जायचं होतं. त्याची तिकिटं बीचवरच मिळणार होती. त्यामुळे तिकडे जायचं ठरवलं. येताना थोडं दूध ,फळे,अंडी ब्रेड वगैरे आणायचा होत. आम्ही पाच साडे पाचला बाहेर पडलो.  दुपारी पाहिलेल्या चौकात आलो.  आता समुद्राच्या बाजूला आम्हाला जायचं होतं.  ते माहीत होतं तिकडूनच मघा आलेलो. पण आता चालत पुढे जाताना थोड विचारत जावं लागणार होतं.  गुगल मॅप लावलेला पण आम्ही थोडं आतून जायचं ठरवलं. म्हणजे आम्हाला आतल्या बाजूचं गावही  पाहता येणार होतं.  फक्त दिशा बरोबर पकडून होतो. गर्द झाडीत बिल्डिंग्ज,  मध्येच कुठे बागा अस अगदी दादरमध्ये फिरल्यासारखे वाटत होतं. ऊन मात्र चांगलेच कडकडीत होत. झाडाच्या सावलीतून  जाताना छान वाटत होत. आताही काही लोक समुद्रावरून परतत होते , काही तिकडे चालले होते. काही मुलं-मुली रस्त्यावर गप्पा मारत उभी होती. जवळच कॉलेज होत. आता समोर समुद्र दिसू लागला. तिथेच जायचं होतं पण जायचा रस्ता मात्र दिसत नव्हता. आम्ही थोड उंचीवर होतो आणि खाली समोर समुद्र आणि पोर्ट दिसत होत.  आम्ही कुणालातरी विचारावं म्हणून पहात होतो. इतक्यात एक बाई तिच्या सात आठ वर्षाच्या मुलासोबत येत होती.  तिला विचारायचं ठरवलं. ती समुद्रावरूनच येत होती. अगदी झिरझिरीत लखनवी हिरवा टॉप घातलेली आणि आत फक्त बिकिनी.  आपण असल्या टॉपच्या आत आणि खाली काय काय घालतो. पण इथे लोकांना काही वाटत नाही. असो. आम्ही तिला समुद्रावर कसे जायचे विचारलं.  तर म्हणाली चला माझ्यासोबत मी दाखवते. मग  तिच्या सोबत चालू लागलो.  तिथून खाली एक गेट आणि तिथून पायवाट होती, तिथून खाली उतरून सरळ जा आणि रेल्वे रूळ क्रॉस करून गेलात की तिकडे पोहोचाल म्हणाली.  आम्ही तिचे  आभार मानले आणि निघालो.

हा शॉर्टकट होता पण फार वापरात नसल्या सारखा दिसत होता.  समोर एक पडकी खोलीपण होती. आम्ही तिथून दोन मिनिटात रेल्वे स्टेशनला पोहोचलो.  एक-दोन लोक रूळ ओलांडत होते आणि आम्हीही तसेच रूळ ओलांडून पुढे आलो.  समोरच आम्ही सकाळी आलेलो तो बस स्टॅन्ड आणि रस्त्याच्या पल्याड पोर्ट.  तिथंच आमच्या कंपनीचे छोटसं  ऑफिस होत. तिथे चौकशी करून परवाची दोन तिकिटं काढली व तिथूनच परवा सकाळी आठ वाजताबोट . सुटणार होती.  तिकडे पोर्टवर काही इंडियन तरुण बाजारात फिरताना दिसत होते

रस्त्याच्या बाजूल बरेचसे स्टाल्स लावलेले होते.  दुकान म्हणजे आपल्या भाषेत टपऱ्या लागलेल्या होत्या.  तिकडेच एका हॉटेलात कोल्ड्रिंक घेऊन निघालो. आता मेनरोड वरून जायचं ठरवलं. तिकडेच त्यांचा किल्ला म्हणजे त्यांच्या भाषेत वॉल, भिंत होती. तो आम्हाला उद्या पाहायचा होता. ते पाहुन ठेवल. तसेच चालत पुढे आलो. तिकडे एका सुपरमार्केट मध्ये शिरलो. काही सामान घ्यायचं होतं आम्हाला म्हणून. दूध, अंडी ब्रेड, घेतल. दही पण दिसत होत. मग त्या बाईला विचारलं दही कुठाय म्हणून तिने एकीकडे बोट दाखवलं.  ते घेतल.  कारण तिथे दूध  दह्याचे बरेच प्रकार दिसत होते. दूधहि आम्ही अदमासेच एक बॉटल उचलली. घरी आलो आणि संध्याकाळी मस्त अंडा करी  केली. सोबत इथून नेलेले पराठे  असं मस्त जेवण झालं.  खूप दिवसांनी रस्सा खाल्ला असं वाटलं. शेवटी असं चमचमीत खाल्लं कीच पॉट भरल्यासारखं वाटत हेच खरं. आता चांगलाच अंधार पडलेला.  आमच्या दरवाजात  दोन खुर्च्या होत्या आणि समोर अंगणात एक सुंदर कॉफीटेबल त्यावर छानशी छत्री आणि दोन खुर्च्या व भिंतीवर सुंदर लॅम्प लावलेले. माहौल मस्त रुमानी बनवत होतं सारं. तिथेच थोडावेळ बसून राहिलो आम्ही.  पूर्ण प्रायव्हसी असलेली अशी ती सुंदर बंगली होती. इतक्या रस्त्यावर असूनही अगदी निवांत.

थोड्यावेळाने झोपून गेलो. पहाटे लवकरच जाग आली. डोळ्यावर उजेड यायला लागलेला. बाहेर फटफटायला लागलेले.  साडेचार पाच वाजता उठलो. माझा नवरा समुद्रावर फिरायला गेला.  मी आपला घरातच व्यायाम केला आणि बाकीचं सामान आवरत बसले. आधी बाहेर वाळत घातलेले कपडे आणले.  दोन-तीन अजून वळायचे होते ते तिथेच ठेवले.  थोड्यावेळाने नवरा आला.मग चहा केला आणि काल आणलेलं ताज दूध घातलं.  गाळून मस्त चहा प्यायला घेतला आणि पहिल्याच घोटाला काहीतरी विचित्र चव लागली. कसलं दूध होतं  कोण जाणे. बकरीचं का आणखी कसलं विचित्र होत. आम्हाला तो चहा फेकून द्यावा लागला आणि पुन्हा दुधाचा चहा केला.  बाहेर टेबलवर चहा पीत बसलो.  इतक्यात एक म्हातारा काहीतरी सांगत आला. तो काय बोलतोय ते कळेचना.  पण त्याच्या हातात चिमटे होते आणि तो काहीतरी सांगत होता.  हातवारे करत होता.  मी पटापट वाळत घातलेले कपडे तिथून काढले. तरी तो काहीतरी बोलत होता.  आता वरून आमच्या ओनरचा पण आवाज आला.  तो आणि हा म्हातारा काहीतरी बोलत होते. आता या म्हाताऱ्यानं तो स्टॅन्ड त्याच्या बाजूच्या दरवाजाकडे नेला तेव्हा मला उलगडा झाला,  की तो स्टॅन्ड त्याचा आहे आणि मी तो वापरला.  माणसं इथून तिथून सारखीच हेच खरं !!!

त्याला मग आमच्या ओनरने  काय सांगितलं माहित नाही,  पण थोड्या वेळानंतर पुन्हा तो आमच्याशी गप्पा मारायला आला. आता आमच्याशी तो छान बोलत होता.  टिटो नेहरू फ्रेंड होते वगैरे काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होता.  मैत्री मैत्री वगैरे हावभाव करून भारत यूगोस्लाविया फ्रेंड होते,  असं सांगत होता.  माझ्या नवऱ्याची त्याची चांगलीच गट्टी जमली थोड्याच वेळात.  त्याला तो घरी येण्यासाठी , ड्रिंक घेण्यासाठी आग्रह करत होता. पण हा गेला नाही. हा म्हातारा आमच्या ओनरचा आजोबा.  बाजूच्याच घरात राहत होता. म्हातारा पण तब्येतनं एकदम ठणठणीत, पांढरा  टी-शर्ट आणि खाकी हाफ पॅन्ट ,तीही ब्रँडेड,  घालून काठी घेऊन फिरत असे.

थोड्यावेळाने आम्ही आवरून स्प्लिट गावात पॅलेस बघायला जाणार होतो. इथे बघण्यासारखं एकमेव ऐतिहासिक वास्तू.  बाकी समुद्रकिनाराच. आता आम्ही टॅक्सी बोलवून जायचं ठरवलं.  नाहीतरी ऊन चांगलंच वाढलेलं होतं.  त्यामुळे टॅक्सीच  उपयुक्त होती. इथली उबर टॅक्सी सर्विस चांगली आहे आणि तशी रिझनेबल पण आहे.  आम्हाला पॅलेसच्या समोरच त्याने सोडलं.  तिकडे त्यांचं भाजी मार्केट पण दिसत होतं.  जाताना भाजी मार्केटमध्ये फेरफटका मारून भाजी,  फळ घ्यायला ठरवलं. इथेही लाल लाल चेरी खुणावत होतीच

आम्ही पॅलेस कडे म्हणजे वॉल कडे  निघालो.  रस्त्यावर दोन्ही बाजूला खूपसे स्टॉल्स(टपऱ्या) लागलेले.  गिर्हाईक घासाघीस करत होती.  दुकानदार लोकांना आकर्षित करत होते. टोप्या,टी शर्ट, खोटे दागिने, कानातलं,असं नेहमीचंच विकायला होत. आम्हाला अर्थातच काही घ्यायचं नव्हतं त्यामुळे सरळ पॅलेसचा रस्ता धरला.  एका मोठ्याशा कमानीतून आत प्रवेश केला. डायोक्लेशिअन या रोमन सम्राटाने चौथ्या शतकात हा पॅलेस बांधला.  पॅलेसमध्ये खूपसे लोक गाईड हवा का विचारत होते.  आम्ही त्यातल्या एकाला हायर केला.  चांगला उंचापुरा शिडशिडीत निकोला त्याचं नाव.  तो सांगत होता हे समोर दिसतात ते त्याकाळचे दोन मुख्य रस्ते. पूर्व-पश्चिम.  त्यामध्ये असलेला हा स्क्वेअर.  रोमन सम्राट डायोक्लेशिअन याने इसवीसन 295 ते तीनशे पाच च्या दरम्यान बांधला.  त्यांनं हे त्याचं हे रिटायरमेंट होम म्हणून बांधलं.  इतिहासातला बहुदा हा एकमेव राजा आहे ज्याने रिटायरमेंट घेऊन नंतर इथं आल्यावर निवांत कोबीची शेती करत आपलं उर्वरित आयुष्य व्यतीत केलं.  अन्यथा राजांचा एक तर नैसर्गिक मृत्यू होतो,  त्यांचा कोणीतरी खून करतो किंवा रणांगणात मृत्यू होतो

आम्ही पहात होतो त्या स्केअरच्या आजूबाजूला समोर तीन मजली इमारतीच्या,  खिडक्या आणि त्याचे बाहेर आलेले दगडी चौथरे .स्क्वेअरच्या मध्ये चार सुंदर खांब त्याच्या वर कमान आणि वर छप्पर.  खालच्या बाजूला दोन छोटे दरवाजे,  त्याच्यावर सुंदर असे दोन पांढऱ्या रंगाच्या  लामण दिव्यासारख्या  खिडक्या होत्या.  तिथे रोमन वेशातले काही सैनिक फिरत होते.  पांढरा शर्ट आणि लाल पॅंट घातलेले. मागे लाल झूल पायात खडावा आणि हातात भाले. लोकांची इथे पुष्कळ गर्दी होती. डाव्या बाजूला त्याकाळी बांधलेलं कॅथीड्रल आणि त्यावर उंच बेल टॉवर दिसत होता. समोर खाली बेसमेंट कडे जाणार्‍या पायर्‍या दिसत होत्या. त्या पायऱ्या उतरून आम्ही खाली गेलो.  तिथे चांगल वीस बावीस फूट उंच असं बेसमेंट होत कमानीवर उभारलेलं. आता इथे सारी दुकाना लागली आहेत.  पण त्याकाळी हे कोठार म्हणून वापरात होतं. असं आमचा गाईड सांगत होता. पण नंतरच्या काही शतकात त्याचा वापर बंद झाला आणि त्याचं  गटारात रूपांतर झाले.  त्याचे तसे आजही  काळे डाग काही ठिकाणी दिसतात.  तो सांगत होता,” हे स्ट्रक्चर इतकं चांगलं राहीलं, याची वाट लागली नाही, कारण इथे कोणी येतच नव्हतं.  तसा फायदा झाला म्हणायचा!” त्याच्या मिश्किल बोलण्याने ती माहिती छान रंजक होत होती. नाही तर ऐतिहासिक माहिती कंटाळवाणी होऊ शकते.”वरही अगदी असच बांधकाम होतं पण आता ते तसं राहिलं नाहीये.”  तो सांगत होता.  आम्ही आता समुद्रकिनारी आलो. इथे पॅलेस ची  संपूर्ण प्रतिकृती ठेवली.आहे.  इथे सुंदर प्रोमनाड प्रमाणात बांधला आहे. “एकोणिसाव्या शतकात त्यांच्या या प्रदेशावर फ्रेंचांनी आक्रमण केलं.  त्यांच्या अधिपत्याखाली असताना त्यांनी हा बांधला आहे.” तो सांगत होता. “फ्रेंचांनी  आम्हाला खूप चांगल्या गोष्टी शिकवल्या.  त्यांनी शिक्षण दिल. बाजार, स्क्वेअर, प्रोमेनाड बांधले, स्वच्छता शिकवली.” त्याला फ्रेंच राज्य व्यवस्थेबद्दल प्रेम दिसलं

  पुढे एक स्क्वेअर होता.  “इथे त्या काळी भाजी  बाजार भरायचा” तो सांगत होता “पंधरा ते एकोणिसाव्या शतकापर्यंत इथं  व्हेनेशियन राज्य करत होते.  त्यानंतर नेपोलियनने  त्यांच्यावर विजय मिळवला, त्यामुळे नंतर फ्रेंच राज्य करत होते.  त्यानंतर सोशलिस्टिक यूगोस्लावियाच्या अधिपत्याखाली हा प्रांत आला.  आणि नंतर स्वतंत्र झाला. पॅलेस च्या बऱ्याच भागात आता वस्ती आहे. मोठ्या महालांचे,खोल्यांचे रूपांतर आता लहान खोल्या, अपार्टमेंटमध्ये लोकांनी केले.  आणि रस्तेही कसे लहान  करून टाकले ते तुम्ही पाहत आहात.”

दरवाजातून आत आल्यावर तिथे मोठा गोल हाल आहे. त्याला वर उंच घुमटही होता जो आता नाहीये.  वर मोकळे आकाश त्या गोलातून दिसत होत. तो सांगत होता हि पॅलेस ची एंट्रन्स लॉबी आहे.  त्यात सम्राट लोकांना भेटत असे.  म्हणजे थोडक्यात त्याचा दरबार होता. त्याकाळी याला मोझॅक टाईल्स ने सगळीकडे सजवलं होतं.  आता मात्र तसं काही दिसत नव्हतं. इथं काही लोकांचा ग्रुप त्यांची पारंपरिक लोकगीत गात होता .  त्यांच्या कॅसेट पण विकायला ठेवलेल्या होत्या.  पांढरा शर्ट आणि काळी पॅंट आणि कमरेला लाल पट्टी असा पोषाख केलेले ते लोक. “त्यांच्या या ग्रुप ला कल्पा असे म्हणतात” असे तो म्हणाला.

“गेम ऑफ थ्रोन्स या मालिकेतला काही भाग इथं चित्रित झालाय” तो सांगत होता. ती मालिका मी पाहिली  नसल्यामुळे मला काही लिंक लागली नाही असो. तिथून आम्ही मग समुद्राच्या बाजूला आलो.  तो भाग पूर्ण उद्ध्वस्त झालेला दिसत होता.  दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस स्प्लिट वरही बॉम्ब वर्षाव झालेला म्हणे.  त्यावेळी पॅलेसचा हा भाग उद्ध्वस्त झाला. आता आम्ही ज्या ठिकाणी उभे होतो तो त्यांचा डायनिंग हॉल होता. मध्ये मोठ्ठ संगमरवरी टेबल होतं,  ते आता मुझियममध्ये ठेवलं आहे. आणि बाजूला एक वोमेटिंग रूम होती. वोमेटिंगरूम काय? विचित्रच वाटलं ऐकायला, तर म्हणे खूप खायचं आणि जाऊन उलटी करायची आणि पुन्हा जेवायचं.  भरपूर पदार्थ खाणं हे त्या काळी श्रीमंतीचं लक्षण होत. लोकांना खायला मिळायची ददात आणि कितीदा खा, किती खातो ते दाखवून देण्याची ही तऱ्हा श्रीमंतीचे बीभत्स प्रदर्शनच!! सर्वसामान्यांना परवडत नाही आणि ते आम्ही असे दोनदा खातो हे दाखवण्याचा अट्टाहास!!!,  हेहि  सार्वकालिक सत्यच.  गरिबांचे खायचे वांदे आणि श्रीमंतांची अन्नाची नासाडी

इथे ज्युपिटर च देऊळ पण आहे.  त्याचा दरवाजावरही एक स्पिंक्स आहे. काळ्या रंगाचा.  दरवाजाच्या चौकटीवर अतिशय सुंदर कलाकुसर केली आहे.  त्यावर देवदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत.  तिथं बाप्तिस्मा दिला जायचा म्हणे.

आता आम्ही गोल्डन गेटला  आलो. हा सर्वात जास्त डेकोरेट केलेला भाग आहे.  अजून शाबूत आहेत त्यामुळे खिडक्यांची रचना त्याकाळी कशी होती याची कल्पना येथे येते.  पुढे बागेत ग्रेगरी ऑफ नीमचा ब्रॉन्झ मध्ये बनवलेला सर्वात मोठा पुतळा आहे.  ग्रेगरी हा दहाव्या शतकात मोठा विद्वान होऊन गेला. त्यामुळे त्याच्या हातात बायबल आहे. त्या काळी रोमन भाषेचा प्रभाव होता.  तेव्हा त्यानेच राजाला रोजचे व्यवहार हे क्रोएशियन या सर्वसामान्यांच्या भाषेत करण्याचा आग्रह धरला.  तो म्हणायचा की तुमची संस्कृती आणि भाषा या कायम जतन करायला हव्यात. किती सार्वकालिक सत्य होतं ते!! तो पुतळा आता काळा पडला असला तरी त्याच्या पायाचा टॉप मात्र लोकांनी हात लावून चमकतो आहे. तसं केल्याने इच्छा पूर्ण होतात असा समज आहे. इथे आमची गाईडेड टूर आता संपली. निकोलाने आम्हाला छान सैर घडवली. बारीकसारीक गोष्टींची खुमासदार माहिती दिली. आम्ही त्याचे आभार मानले

आम्ही पुन्हा मेन स्क्वेअरला आलो कारण आता इथं सम्राट अवतरणार होता. त्याचे अजून काही सैनिक तिकडे जमा झाले.  चौकात गर्दी ही खूप झाली.  सर्वांना त्याचे फोटो काढायचे होते,  पाहायचं होतं . आम्ही समोर उभे राहिलो.  आता थोडे सैनिक खाली उभे होते.  थोड्याच वेळात त्यांचा सरदार आला.  चंदेरी रंगाचा शिरस्त्राण त्याला कमानदार केसाळ महिरप, खाली गुडघ्यापर्यंतच स्कर्ट सारखं लाल वस्त्र, चप्पल असा वेश असलेले सैनिक,  त्याच्यामागे तोंडावर धातूचा मुखवटा घातलेला चिलखत आणि तलवारधारी सरदार त्याच्या बाजूला त्याच्या राज्याची निशाणी असलेल्या पक्षाचे प्रतीक टोकाला लावलेला भालदार चोपदार असे साधारण दहा-बारा सैनिक तिकडे जमा झाले आणि पिंगट केसांचा गोरापान दाढीमिशा ठेवलेला अंगापिंडाने मजबूत  असलेला तपकिरी छटेचं सोनेरी बॉर्डर असलेले वस्त्र संपूर्ण अंगाभोवती गुंडाळलेला, पायघोळ अंगरखा आणि त्यावर एक शेला घेतलेला अतिशय देखणा असा राजा आणि त्या काळातला मोरपंखी रंगाचा गाऊन घातलेली गळ्याभोवती सुंदर मोठाल्या खड्यांचा नेकलेस आणि डोक्यावर टियारा घातलेली सुंदर केसांची, सुंदर राणी समोर आले. राजाने अतिशय आवेशपूर्ण छोटेखानी भाषण ठोकलं. मग सगळे बहुधा महाराजांचा विजय असो असे म्हणाले आणि ती नाटिका संपली

मग आम्ही पुन्हा त्या निमुळत्या गल्ल्या फिरून बघितलय. सगळीकडे जरा मोकळी जागा असेल तिथे कॅफे आहेत.  बाकी मग  दोन-तीन मजली इमारती आहेत त्यात काही लोक इथे राहत असलेले दिसतात.  काहींमध्ये हॉटेल्स आहेत. दोन्ही बिल्डिंगच्यामध्ये दोऱ्या लावून कपडे वाळत घातलेले.  दारात कुंड्या असं दृश्य दिसतं.  त्यांचं हे ओल्ड टाऊन. पॅलेसच्या बाहेर नवं शहर.  तिथून पुढे आलो तर  समोरच मासळी बाजार होता एका शेडखाली पण आता संपलेला, पण एखाद दुसरी मासेवाली आणि गिऱ्हाईक होती.  तिथं टेबल मांडलेली आता रिकामी झालेली.

तिकडेच काहीबाही खाऊन घेतला आम्ही आणि तिथून पुढे समुद्रकिनारी किल्ल्याच्या मागच्या भिंतीला लागून खूप सारी रेस्टॉरंट, कॅफे, बियर बार लागलेली.  इथून तिथून लांबवर छान पांढऱ्या तंबूसारख्या शेड्सच्या खाली टेबल खुर्च्या मांडलेल्या. सगळीकडे लोकांची गर्दी होतीच. प्रोमोनेडवर सगळीकडे पामची झाडं आणि त्या मध्ये खाली फुलांची सुन्दर रोपं, बसायला ठेवलेले बेंचेस.  खूप छान हवा सुटलेली. झाडांची सावली छान थंडावत होती. तिथेच एका स्टॉलवर आम्ही आईस्क्रिम घेतलं. ती मुलगीही अतिशय सुंदर डोळ्यांची बाहुलीच होती. हे लोक फारच सुंदर असल्याचं सारखं जाणवत होतं

समुद्रात सगळीकडे छोट्या बोटी लावून ठेवलेल्या.  दूरवर मोठ्या बोटी याटस, टुरिस्ट बोटी दिसत होत्या.  तिथे जरा वेळ रेंगाळून मग आम्ही भाजीबाजारात आलो. लालचुटुक चेरी आणि बरीच फळे, फुले यांनी बाजार भरलेला होता. भाजीबाजार आता बंद होण्याच्या मार्गावर होता.  अजून अर्धा पाऊण तास असावा. मी आधी त्या चेरी घेतल्या. इथं आल्यापासून त्या मला भुलवत होत्या. मग कांदे बटाटे असं काहीबाही घ्यायला गेले.  दोन-तीन कांदे तेवढेच बटाटे त्याचे तिने चक्क दहा कुना म्हणजे चक्क १०० रुपये घेतले. मी परदेशी आहे म्हटल्यावर लुटायला असलेले स्थानिक इथेही काही वेगळे नाही.  मी गपचुप दिले त्या बाजारात बरण्यात भरून ऑलिव्स पण ठेवलेले होते.

 आम्ही तिथून निघालो आणि टॅक्सी करून घरी आलो. आज मस्त कांदा बटाट्याचा रस्सा केला.  सुपर मार्केट मधून टमाटे आणलेले होतेच. आज संध्याकाळी आम्ही बीचवर जाणार होतो.  त्यामुळे चहा पिऊन साडेपाचच्या सुमारास निघालो. ऊन चांगलंच कडक होत.पाच दहा मिनिटात समुद्रावर आलो. जाताना परत तो काल  पाहिलेला नाला लागला. काही बदकं त्यात डुंबत होती. पुढे तो जिथं सुमुद्राला मिळतो तिथे छोटासा पूल होता.  तिथं एक बदकिण आपल्या पिलांसह राहत होती. ती छोटी छोटी बदकाची पिल्लं मोठी गोड दिसत होती. एकमेकाला बिलगून बसलेली १० -१५ पिल्लं पाहताना आता मजा येत होती. काही लहान मुलेही ते पाहून चेकाळत होती.  खूप लोक समुद्र स्नान घेत बसलेले होते.  काही त्या दगडावर टॉवेल टाकून पुस्तक वाचत, तर काही दूर झाडाखाली बसलेले

आम्ही स्विमिंग सूट घालून पाण्यात उतरलो. पाणी थंड होतं, त्या लोकांना जरी ते नॉर्मल वाटत असलं, तरी आमच्यासाठी थंडच होतं. मी वन पीस स्विमिन्ग सूट  घातलेला बाकीच्या बायका पोरी सगळ्या छान टू पीस   घालून इकडे तिकडे फिरत होत्या. काही समुद्रात पोहत  होत्या.  काही किनाऱ्यावर पडलेल्या.  इथे टू पीस बिकिनी घालणंच त्यांना अपेक्षित असतं,  वन पीस म्हणजे बहुदा अगदीच काकूबाई असावं. पण आपल्याला ती सवय नसल्यामुळे जमत नाही असो.  आम्ही पाण्यात डुंबत होतो. समुद्र छान शांत आहे.  स्वच्छ पाणी पण खाली दगड-गोटे मात्र टोचतात.  किनाऱ्यावरही पायाला टोचत होतंच. त्यामुळे एका दगडावर बसून राहिले मी, नवरा थोडं पाहून आला.  पोहायला न येणं मात्र प्रकर्षाने जाणवलं. दुसरं आम्ही किनार्‍यावरच बसायचं कारण अर्थातच आमचं सामान होतं.  भीती वाटत होती गेले तर काय.  पण इथे बाकीचे लोक सामान ठेवून आरामात फिरत होते. 

आता आमच्या बाजूला एक माणूस त्याच्या दोन छोट्या मुलांना घेऊन पोहायला आला. एक दीड-दोन वर्षांचं होतं, दुसरं साधारण ४-५ वर्षाचं. माझ्या बाजूलाच ते पाण्यात उतरले. मोठा मुलगा पाण्यात खेळत होता. मग हा माणूस लहान मुलाला कडेवर घेऊन त्याचे पाय पाण्यात बुडवत होता. ते ऊई करून ओरडत होतं, थंड लागत होता त्याला. सगळे हसत खेळत खेळत मजा करत होते. त्याला अजून थोडं उडवत होते.  त्यांचा बराच वेळ खेळ चाललेला.  आजूबाजूचे लोकही ते पाहून हसत होते.  थोड्या वेळाने मग त्याला पूर्ण पाण्यात बुडवलं त्यांनी मग ते  छान चेकाळून पाण्याची मजा घेऊ लागलं. हात पाय हलविण्याचा प्रयत्न करत होत. असा  त्यांचा खेळ बराच वेळ चालला होता. आता  आम्हीही निघालो.  किनाऱ्यावर जागोजागी क्युब्स लावले आहेत, त्यामुळे त्यात छान शॉवर घेऊन कपडे बदलून निघालो.  वाटेत येताना ब्रेड घेतला.  उद्या आम्हाला सकाळी लवकर निघायचं होतं.  त्यामुळे आज घरी गेल्यावर निवांतच बसायचे ठरवलं. संध्याकाळी अनाचा म्हणजे आमच्या ओनरचा भाऊ कुत्र्याला घेऊन खेळायला आला.  अतिशय देखणं कुत्रं होत. हा बॉल  टाकायचा आणि ते कुत्र घेऊन यायचं.  असा बराच वेळ त्यांचा खेळ चाललेला. …

क्रमशः …..

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *