आज आम्हाला सगळा दिवस पुन्हा फिरण्यासाठीच मिळालेला तर ज्या गोष्टी परवा पाहायच्या राहून गेलेल्या त्या पाहायचं ठरवलं. आणि अर्थातच डेन्युब बघायची होतीच. व्हिएन्नाला येतानाच डेन्युब बघायची हे ठरलेलंच होत. त्यामुळं ट्रेनने प्रथम डेन्युब टॉवरला गेलो. तिथे जातानाचा रस्ताही सुंदर दोन्हीकडे हिरवाईने नटलेला. टॉवरच्या खाली सुंदर गार्डन. तिकीट काढून आम्ही लिफ्टने वर आलो. २५२ फूट उंच असलेलय या टॉवरवर आल्यावर समोर सगळं व्हिएन्नाचं विहंगम दृश्य दिसत होत. खाली वाहणारी डेन्युब आजूबाजूची सुंदर हिरवाई तिच्या पाण्यातही उतरलेली. त्यानं पाचूसारखी दिसत होती. नदीच्या मध्ये तयार झालेलं बेट. सारं तिच्या सौंदर्यात भरच घालत होत. शहराला जोडणारे वेगवेगळे पूल त्यावर धावणाऱ्या गाड्या वरून अगदी खेळण्यातल्या सारख्या दिसत होत्या. नदी हि खरी जीवनदायिनी असते. वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले ओढे, नाले, उपनद्या हे सारं तिच्यात सामावून घेत ती आजूबाजूचं जीवन समृद्ध करत असते, त्यामुळेच तर मानवी संस्कृती नद्यांच्या भोवतीच विकसित झालेली दिसते. पाण्याचा वापर शेती, वाहतुकीसाठी माणूस करत आल्यामुळे साहजिकच तिच्या भोवतीच शहरं गांव वसत गेली, विकसित होत गेली.
डेन्युब हि युरोपातली दुसऱ्या नंबरची मोठी नदी आहे. जर्मनीत उगम पाऊन नंतर ती ऑस्ट्रिया,स्लोव्हाकिया,हंगेरी,क्रोएशिया,सर्बिया,रोमेनिया,बल्गेरिया,मालदोवा आणि युक्रेन अशी वाहत जाऊन पुढे काळ्या समुद्रात जाऊन मिळते. अशी ही जीवनदायिनी वरून पाहताना फार छान वाटत होतं. वारा मात्र भणाणा वाहात होता. समोर जाळी होती म्हणून बर नाहीतर त्या वाऱ्यानं उडूनच गेलो असतो कि काय अशी भीतीही वाटली क्षणभर!!
समोर व्हिएन्ना इंटरनॅशनल सेन्टर हे युनोचे ऑफिस असलेली उंच बिल्डिंग दिसत होती. बाकीच्याही बऱ्याच इमारती दिसत होत्या. खाली गाड्या माणसं अगदीच इटुकली दिसत होती. तिथं थोडा वेळ थांबून नदीच्या जवळ जायचं ठरवलं. तिथून आम्ही नदी किनाऱ्यावर आलो. तिकडे सुट्टीचा आनंद लोक मनसोक्त घेत होते. सायकलिंग,स्केटिंग,कायाकिंग, करणारी मोठी माणसं लहानमुलं सारेच दंग होते. काही लोक समुद्रस्नान घेत निवांत पहुडले होते. आम्ही तिच्या काठावरच्या पायऱ्यांवर पाण्यात पाय सोडून बसलो. समोर खूपशी बदकं सुशेगात विहरत होती. काही लोक त्यांना खायला काही बाही टाकत होते. ती अगदी पायाच्या जवळून जात होती. हात लावावासा वाटत होत. पण ती सुळकन पळून जात होती. पांढरी शुभ्र बदकं पाण्यावर तरंगताना पाहताना असीम आनंद होत होता.
थोडा वेळ तिकडे थांबल्यावर जेवायची वेळ झाली म्हणून आम्ही तिकडेच असलेल्या खाण्याच्या स्थळाकडे मोर्चा वळवला. हिरवळीवर टेबल खुर्च्या लावलेल्या. काही टेबलांवर छत्र्या लावलेल्या काहींवर नाही. आम्ही छत्री लावलेलं एक टेबल रिकामं होतं तिथे जाऊन बसलो. तिथे व्हेज बर्गर दिसत होता त्याचीच ऑर्डर दिली. थोड्या वेळानं तो घेऊन आलो, तर आत चिकन स्टफ होतं आणि खूपसं सलाड घातलेलं. म्हणजे व्हेजिटेबल घातलेलं चिकन टिक्की असलेलं व्हेज बर्गर!!!! असो. तसही प्युर व्हेज हि संकल्पनाच तिकडे फार कमी दिसते. त्यामुळं व्हेजिटेरियन लोकांनी त्यातले पदार्थ बघून खात्री करून घेऊन मगच ऑर्डर दिलेली बरी.
आभाळ भरून आलेलं. थोड्याच वेळात पावसाला सुरवात झाली. आमच्या टेबलला छत्री होती पण बाजूच्या टेबलवर एक वृद्ध जोडपं बसलेलं. त्यांच्या टेबलाला छत्री नव्हती. ते आमच्याकडे पाहायला लागले. मग आम्ही त्यांना आमच्या इथे येण्याची विनंती केल्यावर ते लगेच आले. फ्रेंच होते ते. पॅरिसहून इथे कुठल्याशा चित्राच्या प्रदर्शनासाठी आलेले. मग ते लोक गप्पा मारत बसले. कुठून आलात, इथं किती दिवसांपासून इथं आहात’ काय काय पाहिलं वगैरे विचारत होते. आम्ही भारतातून आलो असं सांगितलं आणि त्यांना तुम्ही कधी आलात का भारतात ते विचारले. त्या वर तो म्हणाला कि ,’ काही वर्षांपूर्वी मी दिल्लीला आलो होतो कामानिमित्त, त्यावेळी राजस्थान पहिल्याच आणि आवडल्याचं सांगितलं. मुंबई पण पाहिल्याचं म्हणाला. आम्ही तिथून जवळच असलेल्या शहरात राहतो असे त्याला सांगितलं.
“तुमच्याकडे खूप साऱ्या भाषा बोलतात ना?”
“हो प्रत्येक राज्याची वेगळी भाषा आहे.”
मग शिक्षण कोणत्या भाषेत घेता?”
“ज्याला हवं तसं मातृभाषेत व इंग्लिश मध्ये”
“मग टीचर कोणत्या भाषेत बोलते?” त्या बाई ने पटकन विचारलं.
“इंग्लिश, हिंदी, किंवा प्रादेशिक, जे आवश्यक असेल तसं”
हा प्रश्न खरंतर खूप अंतर्मुख करून गेला. आपण या गोष्टीचा विचारही करत नाही आपल्या मुलांना इंग्लिश शाळेत घालताना. ती कोणत्या भाषेत बोलतील, त्यांना इतक्या लहान वयात त्या अनाकलनीत भाषेत खरच काही समजेल का? त्या बिचाऱ्याची काय अवस्था होत असेल. आधीच नवा माहौल त्यात नवी भाषा!!! असो.
थोडावेळ त्यांच्याशी गप्पा मारून आम्ही निघालो.
तिथून आम्ही एका स्टेशनला उतरलो. इथं ब्रातिस्लाव्हा या स्लोवेनियाची राजधानी असणाऱ्या गावाला जाणाऱ्या बोटी दिसत होत्या. तशा या आधीही एकदा दिसलेल्या त्या. इथून बोटीनं ते एखाद तासाच्या अंतरावर आहे. आम्हाला खूपच हळहळ वाटली. आज आमचा इथला शेवटचा दिवस होता. एखादा दिवस जास्त असता तर ब्रातिस्लावाही पाहून झालं असतं अशी चुटपुट लागून राहिली. पण असं व्हायचंच एक तर आपल्या आपण ट्रिप प्लॅन करताना अशा त्रुटी राहतात. आणि थोड्या दिवसात इतकं सारं बसवताना काही ठिकाणं सोडवीही लागतातच.
तिथेच एका ठिकाणी स्ट्रीट फूड चे स्टॉल लागलेले. तिकडे चायनीज फूड चा पण स्टॉल होता. तिथे नूडल्स घेतल्या त्या मस्त झणझणीत नूडल्स खाऊन मन भरलं. मग तिकडेच थोडा फेरफटका मारला. एका ठिकाणी आईस्क्रीम शे दुकान होतं त्यातून आईस्क्रीम घेतलं आणि तिथल्याच बेंचवर बसून खात बसलो पायात चिमणी येऊन बसली. चिमणी हा कायमच आपला अगदी बालपणीचा मित्रच असते. मनाच्या कोपऱ्यात कायम बसलेली असते. मी तिलाच निरखत बसले. ती काही बाही टिपत इथं तिथं बसत होती. कित्ती छान असते चिमणी!!!
तिथून आम्ही रिंग स्ट्राझं ला जाण्यासाठी ट्राम ने निघालो. तर ती आमच्या घराजवळच्या रस्त्यावरूनच जात असल्याचं लक्षात आलं मग रिंग स्ट्राझं ला पार्लमेंटच्या स्टॉपला उतरलो. समोरच त्यांचं पार्लमेंट दिसत होतं. पण आता त्याच्या डागडुजीचं काम चालू असल्याने बंद होतं. मग सिटी हॉल, ऑपेरा, काही युनिव्हर्सिटीज, असं बरंच काही त्या भागात आहे ते नुसतंच बाहेरून बघत हिंडत होतो. नुसतं फिरायलाही खूप मजा येत होती. सगळीकडे मस्त झाडी, सुबक देखण्या इमारती, मधूनच जाणारी ट्राम, उंची गाड्या रमतगमत चाललेलो. मग नंतर तिकडेच असलेल्या फोक्स गार्टन ला गेलो. सगळीकडच्याच बागा सुंदर बनवलेल्या असतात. सगळीकडे गुलाब असतातच. या गुलाबांना अक्षरशः गुच्छांनी फुलं असतात, चांगली टपोरी. आपल्याकडे हिमाचल, काश्मिरात असे गुलाब दिसतात. बहुदा थंड प्रदेशात गुलाब जास्त फुलत असावेत, कारण यु के मधेही अशीच गुलाबांनी बहरलेली झाडं आम्ही पाहिलेली. तिकडचं थोडा वेळ बसलो. एक लहान ५-६ वर्षांचा मुलगा चांगला मोठा लेन्स चा कॅमेरा घेऊन फोटो काढत होता त्याची आई हि त्याच्या सोबत होती. तिचेही फोटो गुलाबासोबत काढत होता. मग तिनेही त्याचे काही फोटो काढले. मला मजा वाटली इतक्या लहान मुलाच्या हातात तो कॅमेरा देऊन त्याला शिकायची संधी देत होती ती!!! असो .
चालतच घरी निघालो कारण तसा वेळ होता आणि आता रस्ताही माहित झालेला. रमतगमत सगळं पाहत जाण्याचा आनंद काही औरच असतो. एखाद्या ठिकाणी वाटलं तर रेंगाळता येतं. राहण्यासाठी जगातील सर्वोत्तम असा ‘किताब पटकावणारं हे शहर असं चालत फिरत बघण्यातच मौज आहे. रस्त्यावर ट्राम, सायकली, भारी गाड्या, मोटर सायकली सगळं जात होतं अगदी व्यवस्थित. कसलाही गोंगाट, हॉर्न काही नाही. सारं सुशेगात !!
रस्त्याच्या दोन्ही बाजूला फूटपाथ आणि सायकल ट्रॅक, मध्ये झाडी आणि मग मुख्य रस्ता असा भलामोठ्ठा रस्ता अगदी व्यवस्थित नियोजन करून बांधलेलं!!! दीडशे वर्षांपूर्वी बांधलेलं हे सारं किती विचारपूर्वक नियोजन केलं असेल!! त्याच रस्त्यावर ट्रामचीही व्यवस्था केलेली. ती छोटीशी २-३ डब्ब्यांची ट्राम रस्त्यावरून निवांत जात असते. खूप छान दिसते. कुठल्याही वळणावर अगदी लीलया वळणं घेत दिमाखात जात असते. अगदी गल्ल्या बोळातूनही ! अगदी वृद्धांनाही सहज चढ उतार करता येईल अशी ही गाडी आपल्याकडे का सुरु होत नसेल असा विचार सहजच मनात आला पण लगेच उत्तरही आलं मनात.. हि अशी गल्ल्याबोळांतून जाताना मध्ये तीला हात दाखवून थांबवून रस्ता ओलांडणारी मंडळी ,खेळणारी मुलं , दुचाकी, गाड्या, गुरं, प्राणी काहीही मध्ये येऊ शकेल आपल्या इथं आणि मग ती तिथेच थांबून जाईल!!!!
तिकडेच पुढे एका ऑपेरा हाऊस मधून खूपसे लोक बाहेर येताना दिसले. त्यांचे शोफर त्यांच्यासाठी गाडी घेऊन येत होते. सुटाबुटातले पुरुष आणि फॅशनेबल कपडे घातलेल्या बायका. ऑपेरा साठी खास ड्रेस कोडच असतो. बाकी रस्त्यानं खूपसारी दुकानं, शो रूम्स होत्या महागड्या ब्रँड्सच्या पण सगळ्या बंद. काचेतून लावलेले कपडे, इतर गोष्टी दिसत होत्या. इथं रविवारी फक्त खादाडीची दुकानं म्हणजे हॉटेल्स, कॅफे,बियर बार, रेस्टारंटस असंच उघड ठेवायची परवानगी असते बाकी सगळं बंद कारण कुटुंबासाठी, मिञमंडळी समवेत हा दिवस घालवावा अशी त्यामागची कल्पना आहे. खूपच उदात्त विचार आहे खरंतर. घरी पोहोचलो तेव्हा संध्याकाळचे ६ वाजलेले. ऊन चांगलंच होतं बाहेर अजून.
घरी येऊन साऱ्या सामानाची बांधाबंध केली आणि जेवून झोपलो. उद्या सकाळी लवकरच नघणार होतो. एअरपोर्ट ला जाणारी मेट्रो आमच्या घराजवळच्याच स्टेशन वरून सुटत होती. हि एक मोट्ठीच सोया होती. त्याप्रमाणे सकाळी ८ लाच घर सोडलं, त्याची चावी शेजारीच राहणाऱ्या आमच्या वनेरला दिली. तिच्या नवऱ्यानेच ती घेतली. हि आमची ओनर मात्र आम्हाला पुन्हा दिसलीच नाही. स्टेशन वर येऊन थांबलो, थोड्याच वेळात दुकानं उघडली. पण भरपूर सामान आमच्याकडं होतं त्यामुळं मग आम्ही एक जण सामनाकडे आणि एक जण असं करून थोडीफार शॉपिंग करून घेतली आणि मेट्रोने विमानतळावर आलो. आतामात्र आम्हाला घरी जायचे वेध लागलेले.
Leave a reply