• Menu
  • Menu

Munich, Germany … day 1 … by Rohan

MBA झाल्यावर जॉब चालू व्हायच्या आधी मोठी सुट्टी मिळालेली. त्याचा अर्थातच चांगला उपयोग करून घ्यायचा होता. कारण पुन्हा अशी मोठी आणि निवांत सुट्टी मिळणं मुश्कीलच!! मग युरोपला फिरायला जायचं ठरवलं. कारण मागच्या वर्षी युरोपात फिरताना खूप सारं पाहायचं राहिलंय खरंतर अगदीच थोडा युरोप पाहिलाय असं वाटत होतं त्यामुळं युरोपलाच जायचं हे ठरलेलं आता कुठे जायचं ते ठरवायचं होतं.जर्मनीला जायचं हे ठरलेलं कारण जर्मन भाषा शिकल्यामुळे तिथलं आकर्षण होतच. त्याचबरोबर तिथली टेक्नॉलॉजि, त्या देशानं दुसऱ्या महायुद्धांनंतर बेचिराख झाल्यावरही केलेली प्रगती, त्याचं विभाजन आणि पुनर्मिलन सारंच आकर्षित करत होतं त्यामुळं जर्मनी हे निश्चित होत. मग त्यासोबत प्राग,व्हिएन्ना ,आम्सटरडॅम, असा प्लॅन बनवला. मग कुठून कुठे कसं जायचं ते सगळं ठरवलं. म्युनिक वरून ड्रेस्डेन ला जाणं उलटं पडत होतं. त्यामुळे मग ड्रेस्डेन कॅन्सल करावं लागलं आणि म्युनिक वरून व्हिएन्ना आणि तिथून प्राग आणि शेवटी ऍमस्टरडॅम असा प्लॅन केला. इथून मीआणि माझा अजून मित्र जाणार होतो आणि युरोपला गेल्यावर तिथेच Ph.D करत असलेली आमची मैत्रीण आणि अजून एक जण आम्हाला जॉईन होणार होते. ते दोघे बार्सिलोनाला असतात त्यामुळं ते आम्हाला व्हिएनाला जॉईन होणार होते. पण ऐनवेळी माझ्या मित्राचंही कॅन्सल झालं. आता म्युनिकला ३-४ दिवस मी एकटाच फिरणार होतो.त्यासाठी मग आई बाबाना पटवलं आणि तिकिटं बुक केली. ती खूप आधी केल्यामुळं बरीच स्वस्त पडली

मग असेच एक एकेकटे फिरलेल्या माझ्या एक दोन मित्रांना त्यांचे अनुभव विचारले. आणि एकटं फिरण्याची तयारी केली. आता व्हिसा वगैरे बाबीही मलाच एकट्याला करायच्या होत्या. हाही एक अनुभव मिळणार होताच. त्यामुळं मग सगळीच प्रोसेस एकट्यानेच करायचं ठरवलं. मी इथून म्युनिक ला उतरणार असल्याकारणाने मी जर्मन व्हिसाला अप्लाय केला. एकदा शेन्जेन व्हिसा मिळाल्यावर मग सगळीकडेच फिरता येतं. मग सारे सोपस्कार पार पडून साधारण आठ दिवसात माझा व्हिसा आला. आता करन्सी किती घ्यायची, कशी कॅरी करायची ते सारं नीट प्लॅन केलं. तिथे चालणारं कार्ड घेतलं. त्यात काही पैसे ठेवले आणि काही कॅश ठेवली. फोन कार्ड मी हेच वापरणार होतो. कारण तिकडे सगळीकडे वायफाय असेल तिथे मला व्हाट्सअप कॉल करता एणार होता आणि इतर वेळी माझ्याच फोनवरून मी कॉल करायचं ठरवलं.

. मग तिथल्या वेदर प्रमाणे कपडे, खाण्यासाठी थोडंफार कोरडे पदार्थ असं सगळं घेतलं. एकटाच जाणार असल्याने खूपच उत्साह होता. वेगळ्या देशात एकट्यानं फिरायचं हि कल्पनाच भन्नाट होती. मी एप्रिल महिन्यात जात असल्या कारणाने थंडी बरीच असणार होती. त्यामुळं माझ्या बॅगेत गरम कपडे भरपूर होते.

ठरल्याप्रमाणे मी इथून मुंबई ला गेलो, तिथूनच रात्रीची फ्लाईट होती माझी. लुफ्तान्झा एअर ची !!!

चेक इन, इम्मीग्रेशन असे सारे सोपस्कार करून विमानात बसलो. विमानात माझ्या शेजारी एक लग्झएमबर्ग चं म्हातारं जोडपं बसलेले. ते नुकतीच १०-१२ दिवसाची राजस्थान टूर करून आलेले. हि त्यांची भारताची ८-९ वी ट्रिप होती म्हणाले. मला खूपच अभिमान वाटला आणि आनंदही झाला कि हे लोक परत परत भारताला भेट देतात म्हणजे त्यांना आवडला असणार माझा देश !!! पण लगेचच कळलं कि या ट्रिप मध्ये त्यांना कुणीतरी फसवलं त्यामुळं ते खट्टी होते. खूपच वाईट वाटलं. वाटलं आता हे पुनः येतील का? आणि त्यांच्या मित्रांना हे सांगितलं तर ? खरंच पर्यटन हा व्यवसाय म्हणूनच स्वीकारण्याची आणि त्याचे नियम काटेकोरपणे पाळण्याची किती गरज आहे असं वाटून गेलं.

थोड्याच वेळानं मी मस्त ताणून दिली कारण या फ्लाईटला कुठेही ले ओव्हर नव्हता, डायरेक्ट म्युनिक लाच जाणार होतो. ८ तासातच मुनीकला पोहोचलो. बाहेर प्रचंड थन्डी होती. टर्मिनल वरून ट्रेन ने इम्मीग्रेशन ला आलो. इथे खूप सारे भारतीय होते रांगेत. मी साहजिकच थोड्या गप्पा मारल्या त्यांच्याशी. ते लोक इथे कुठलासा फेअर होता त्यासाठी आलेले होते. मग त्यांनाही इथं काय पाहणार वगैरे विचारले आणि मनातल्या मनात माझी आयटेनरी बनवली. सारे सोपस्कार पार पाडून बाहेर आलो. बाहेर काळोख होता. चिटपाखरू नव्हतं. एकच माणूस दिसला त्याला म्युनिक ला कसं जायचं विचारलं. त्याने समोर उभ्या असलेल्या बसकडे बोट दाखवलं. तिकडे गेलो तो कंडक्टर म्हणाला हि नाही ती दुसरी बस जाते मग तिथून दुसऱ्या बस ला गेलो. तर पुन्हा त्यानं ,मला आधीचीच बस जाईल असं सांगितलं. काही कळेना मग पुन्हा पहिल्या बसमध्ये बसलो मग त्याने १० युरो तिकीट दिलं. धाकधूक होतीच. बस मध्ये माझ्याव्यतिरिक्त कोणीच नव्हतं. पण बस बरोबर वेळेवर सुटली. थोड्याच वेळात एका स्टेशनला पोहोचलो. तिथून मला ट्रेनने माझ्या हॉटेल पर्यंत जाता येईल असं त्या कंडक्टर ने सांगितले. मग तिथून ट्रेन स्टेशन ला आलो आणि माझ्या हॉटेलजवळ उतरलो. माझ्या हॉटेलला फोन करून कसं यायचं ते विचारलं. त्याने सांगितल्या प्रमाणे गेलो. दोन पाच मिनिटातच पोहोचलो.

माझा चेक इन २ वाजताचा होता आणि आता तर ८च वाजलेले. मग मी सामान तिथे ठेवलं. त्यांची वॉशरूम वापरून फ्रेश झालो आणि फिरायला बाहेर पडलो. थेट म्युनिक सिटी सेंटर ला आलो. तिथं श्माल्झ नूडल्स खाल्ले. डोनेट सारखंच असतं. मग तिथून फार्मर्स मार्केट बघितलं. तिथे भाजी, फळं, मीट, असं घेऊन लोक विकायला आलेले. तमाम ताजी फळं, भाज्या, सारं बॉक्सेस मध्ये ठेवलेलं विकायला, प्रत्येकावर त्याच्या किमतीचे बोर्ड लावलेले. तिकडे एक फेरफटका मारून तिथून निघालो. तिकडून मी सिटी सेन्टर ला मारियन प्लाझ आहे तिथे आलो. हे बव्हेरिया चा ड्यूक हेन्री द लायन याने बांधलेलं आहे. म्युनिक चा हा मध्यवर्ती भाग असल्याने बाकीची प्रक्षणीय स्थळं हि याच्या आजुबाजुलाच आहेत. त्यामुळं इथूनच पुढेही ही जात येणार होतं. या स्केअरला हे नाव कुमारी मेरी वरून देण्यात आलं आहे. साधारण १८०७पर्यंत हीच मुख्य बाजारपेठ होती. त्यांनतर ती व्हिक्टोरियन मार्केटला गेली. आणि १९७२ साली झालेल्या म्युनिक ऑलिम्पिक पासून हा सारा भाग वाहन रहित म्हणजे पेडेस्टरीयन केला गेला. त्यामुळं लोक आता इथे निवांत फिरू शकतात, सायकली चालवू शकतात, लहान मुलं बिनधास्त फिरू शकतात. त्याचमुळं अर्थात हे पर्यटकांसाठीही आकर्षण बिंदू आहेच.

इथे ओल्ड टाउन हॉल आहे जिथल्या टॉवरवर एक भलं मोठं घड्याळ आहे. त्याच्या खालच्या भागात एक वैशिष्ट पूर्ण असा शो होतो. तोच पाहायला मी आणि सारे लोक थांबलेलो होतो. तासाला पाच मिनिटं कमी असताना तो शो सुरु झाला. घड्याळाच्या बरोबर खालच्या खिडकीवजा भागात हातात तुतारी, टृम्पेट, दंड, ध्वज, भाले असे घेतलेलं पुर्णाकृती पुतळे दोन्ही बाजुनी सरकू लागले, शेवटी दोन्हीकडून एकेक घोड्यावर बसलेले भालेस्वार आमने सामने आले. मग पुन्हा पहिलीच मंडळी समोर आली आणि शेवटी त्या भाले स्वाराने दुसऱ्याला मारले, तो घोड्यावर पडला. आता त्याखालच्या मजल्यावर शो सुरु झाला. रंगीबिरंगी कपडे घातलेले लोक हात वर करून स्वतःभोवती गिरकि घेत नाचत होते. इकडून तिकडे असे तेही दोन वेळा फिरले. आणि शो संपला आणि तासाचा टोला पडला. उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला तर मुलं आनंदाने चेकाळून ओरडत होती. त्यामुळं जास्तच मजा आली.

तिथून मग मी डॉइशेस मुझियमला गेलो. इथे जहाजं, विमानं, वातदिशादर्शक,शाही होड्या, छोट्या नावा, मशिन्स, तोफा, विजेचे ट्रान्सफॉर्मर, वाफेवरची इंजिनं, अशा विज्ञान तंत्र ज्ञानावर आधारित एक लाख वस्तू आहेत म्हणे. पार अगदी अशमयुगापासून आता पर्यंत मानवी प्रगतीच्या इतिहासातील असंख्य गोष्टी इथे मांडून ठेवल्यात ज्यात शेकोटीपासून पार घोड्याच्या नाली पर्यंत सारं काही होतं. पाहायला दिवसही पुरणार नाही, त्यामुळं साऱ्या पाहणं शक्यच नव्हतं. मी पटापट ते नजेरेखालुन घातलं आणि बाहेर आलो. साधारण एक दीड वाजलेला मग मी तिकडेच फेमस असलेला डोनर कबाब खायला गेलो. बर्गरच्या आत भाजी, चिकन असलेला तो टर्किश कबाब छानच होता. मग तेथून पुन्हा हॉटेल ला आलो. दोन वाजलेले त्यामुळं त्यांनी रूम रेडी असल्याचं सांगितलं. हि एक डॉर्मेटरी होती ज्यात ६ बेड होते आणि प्रत्येक बेडला खाली सामान ठेवायला लॉकर होता. त्यात मी माझी बॅग ठेवली आणि मस्त शॉवर घेतला. आणि येऊन गरम झोपून गेलो. साधारण ४-४.३० ला जग आली. मग आवरून पुन्हा बाहेर पडलो. आता मला माझी इथेच रिसर्च करत असलेली एक मैत्रीण भेटणार होती. मग पुन्हा सिटी सेंटर आला आलो. मेरियन प्लाझ्झ ला ती भेटली. मग आम्ही तिकडेच थोडंफार खाऊन घेतलं आणि म्युनिक चा फेमस बिअर हॉल ला आलो. तिथे मोठमोठाल्या पिचर्स मधून बिअरचा आस्वाद घेत लोक त्यांच्या मित्रमंडळींसोबत हसत खेळत गप्पा मारत बसलेले. जर्मन म्हणजे बिअर हवीच !!!! सगळा माहौल मस्त रुमानी होता. आम्हीही त्याचाच एक भाग बनून गेलो. वेळ कसा गेला ते कळलंच नाही. मग तिथून बाहेर पडलो आणि तिथलं क्रेझी आईस्क्रीम छान असतं असं ती मैत्रीण म्हणाली म्हणून मग तिकडे गेलो. तर इथेही बिअर आईस्क्रीम !!! क्या बात है!! जर्मन बिअर चे चाहते आहेत हे तर खरच पण त्यांनी आईस्क्रीममध्ये पण बिअर ओतलेली …. मस्त मजा आ गया !!! त्या अफलातून आईस्क्रीमची चव घेऊन आम्ही निघालो. तिला बाय करून मी पुन्हा रूमवर आलो आणि मस्त ताणून दिली. उद्या मला नोशवेस्टशाईन हा पॅलेस बघायला जायचं होत. डिस्ने लँड ची कल्पनाच मुळी या पॅलेस वरून घेतलीये त्यामुळं तो बघायचा हे निघतानाच ठरलेलं.

शब्दांकन : स्मिता 

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

1 comment