• Menu
  • Menu

भाग-१०: संगीतमय साल्झबर्ग….!!!!!!!!!

दुसऱ्या दिवशी पहाटे नेहमीप्रमाणे उठून तयारी करून ब्रेक फास्ट साठी थोडे फ्रेंच टोस्ट करून घेतले. काल आणलेला जूस, पाणी, छत्री, जॅकेट, सारं बॅगेत भरलं आणि निघालो. आम्हाला वेस्टबॉन हाफ स्टेशनवरून ट्रेनने सॉल्ज़बर्ग ला जायचं होतं. जायला साधारण दोन तास अकरा मिनिटं लागतात असं लिहिलेले होते. संध्याकाळी आम्हाला परत यायचं होत. स्टेशनला लवकरच पोहोचलो. तिकडं काही इंडियन पण होतेच. त्याच ट्रेन साठी थांबलेलं. हे शेवटचं स्टेशन आपल्या चर्चगेट सारखं त्यामुळं ट्रेन ट्रॅक उभीच होती. पण अजून दरवाजे उघडले नव्हते. थोड्याच वेळात ते उघडले. हि गाडी पण डबल डेकर होती आणि इथेही कुठेही बसता येणार होत. आम्ही अर्थातच वरच्या मजल्यावर जाऊन बसलो. मधल्या सीट समोरासमोर असलेल्या सीटवर. मध्ये टेबल होतच आपल्यासारखे. हळू हळू गाडी भरायला लागली. आमच्या समोर एक तरुण जोडपं येऊन बसलं. मुलगी जपानी वाटतहोती, मुलगा मात्र युरोपियनच असावा. विचित्र कपडे घातलेला. लेदरची ब्राऊन टाईट आणि तसलच जॅकेट, त्यावर बरीचशी बटणं मेटलचे हूक्स, झुरमुळ्या असं काही बाही चंकीफन्की घातलेलं. बहुदा फॅशन शोला चाललेला असावा.  सतत त्या कपड्यांबद्दल तिच्याशी बोलत होता. बटनं बिटणं दाखवून. असो माझा आपला थोडासा टाईमपास!!

गाडी आता बऱ्यापैकी भरली. थोड्याच वेळात सुरूपण झाली. ट्रेनच्या खिडकीतून बाहेरचं दृश्य छान दिसत होतं. शहर मागे पडलं आता लांबवर पसरलेली शेती दिसत होती. अधे मध्ये छोटी  छोटी ७-८ घरांची गावं  (… आपल्या पाडया )दिसत होती. मधेच एखाद मोठे गावही लागायचं. एखादा ट्रॅक्टर घेऊन जाणारा शेतकरी, कुरणात चरणारी गुरं, असा सुंदर दृश्य होत. क्वचित माणसंही चालताना दिसत होती. दोन्ही हातात काठी घेऊन जाणारी , ही पण खास युरोपियन स्टाईल, स्की वॉकिंग सारखं.  त्याचेही काही नियम असतात. तिला अडजस्टमेंट्स असतात. उंचीप्रमाणे अड्जस्ट करता येते ती. 

बाहेरचं दृश्य मोहवणारं होत खचितच.  युरोपची कंट्री साईड फारच सुंदर आहे हे पुन्हा जाणवत होतं. थोड्याच वेळात तिकीट चेकर तिकीट चेक करून गेला. ज्यांनी तिकीट  घेतली नव्हती त्याना देऊन गेला. थोड्या वेळाने तोच मेनू कार्ड घेऊन आला. कुणाला काही खायची ऑर्डर द्यायची का विचारून गेला. आणि परत ती ऑर्डर घेऊन पण आला. आम्ही कॉफी  मागवलेली ती आणि बाकीच्यांची जी काही असेल ती. सारी कामं तोच करत होता. ऑल इन वन जॉब होता !!

वाटेत गाडी काही स्टेशन्स वर थांबत होती. प्रवाशांची चढ उतार होत होती. समोरचं जोडपही पहिल्याच स्टेशन ला उरलेले.  मध्ये कुठलंसं मोठठं औद्योगिक शहरही लागलं. 

लांबवर आता डोंगर दिसू लागले. कुठलंतरी सुंदरसं गाव लागलं. आजूबाजूच्या घराच्या गॅलरीत , छ्ज्यावर, खिडक्यात रंगीबेरंगी फुलांच्या कुंड्यांची आरास केलेली. त्या पांढऱ्या घरांच्या काळ्या खिडक्या दार, कालच छत आणि आजूबाजूला अंगणात सुंदर हिरवळ, फुलझाडं, आणि वर लटकणारी कुंड्यातली फुलं. अगदी चित्रातल्यासारखंच सुंदर … असावा सूसुंदर असाच बंगला असं वाटायला लावणारं दृश्य अगदी!!घराच्या गच्चीत आजूबाजूला सजवलेली सुन्दर बाग हे त्या घरची गृहिणी किती गृहकृत्य दक्ष आहे त्याचं प्रतीक असतं म्हणे!!! त्यामुळे सगळ्या घरांच्या बागा अगदी नीटनेटक्या सुंदर सजवलेल्या. 

थोड्याच वेळात आम्ही साल्झबर्ग ला आलो. हे मोत्झार्ट चं गाव. इथं त्याच घर आवर्जून पाहायचं होतं . बाकी गावच एवढं सुंदर होतं कि तेच नुसतं भटकत बघायाच ठरवलेले. स्टेशनच्या बाहेर आलो पण आता कुठल्या बाजुला जायचं ते कळेना. एक दोघांना विचारलं पण त्यांना इंग्लिश कळेना. मग कुणीतरी सांगितलं ती दिशा पकडली. पुढे खूप सारे लोक त्याच दिशेने चाललेले.  मग खात्री पटली योग्य दिशेनं चालल्याची, त्यांचाच मागे निघालो. थोड्याच वेळात मीराबेल पॅलेस लागला. सुंदर अशी बॅग स्वागताला होती. खूप सारे गुलाब आणि बाकीच्या फुलांची आणि हिरव्या बॉर्डरची नक्षी असलेल्या त्या बागेत एक वेडिंग फोटो सेशन चाललेला. हे मात्र खरंखुरं दिसत होत. पारंपरिक वेशातील वऱ्हाडी मंडळी हौसेनं पोझ देत होती. त्यात वधू वरांचे पालक आणि आजी  आजोबा हि दिसत होते. छोटी मंडळीही होती. पांढरा गाऊन वर टियारा घातलेली वधू आणि सुटाबुटातला वर दोघेही सुंदर दिसत होते आणि उत्साहात होते. थोड्याच वेळात ते लोक त्या इमारतीत असलेल्या चर्च मध्ये गेले आम्हीही तो पॅलेस पाहायला गेलो. कमानीतून आत गेल्यावर खूप मोठीशी वेगवेगळ्या नुसत्या गुलाबांचीच बाग तिथे होती. बाकीही ठिकाणी कारंजी आणि सुंदर सुंदर बागा होत्याच. दोन्ही बाजूला झाडी आणि बेंचेस होते. कुणीतरी तिथे व्हायोलिन घेऊन वाजवत बसलेला. साहजिकच होत ते कारण आम्ही साक्षात सुरांच्या जादूगाराच्याच गावात होतो!! 

तिथून बाहेर पडलो आणि आता नदीच्या दिशेने निघालो. आम्हाला नदीच्या पल्याड जायचे होते. रस्त्यावरून इलेक्ट्रिकच्या जोडबस, तसेच घोडा गाड्याही दिसत होत्या. गावातून फिरताना खूपच छान वाटत होतं.  वळणावरून पुढे आल्यावर समोरच नदी आणि तिच्यावरचा पूल दिसला. फक्त पादचाऱ्यांसाठीच असलेल्या त्या पुलाच्या कठड्यांवर खूप सारी कुलपे लावलेली. हि पण एक इकडच्या लोकांची अंधश्रद्धाच!! प्रेमिक त्या कठड्याला कुलूप लावतात आणि चावी नदीत फेकून देतात. असं केल्यानं प्रेम अमर रहातं अशी समजूत.. खरतर त्यासाठी तुमची तडजोड आणि विश्वास जास्त गरजेचं असतो हे खरच. पण प्रेमातच तर असा वेडेपणा करता येतो ना!!! असो . ही सालझार नदी तिच्या पल्याड जुनं शहर आणि अल्याड नवं शहर आहे म्हणे. नदीपात्रात एका टुरिस्ट बोट चालक ती गोल गोल फिरवून त्यातील प्रवाशांचं आणि पर्यायाने आमचहि मनोरंजन करत होता.

जरा पुढे आल्यावर एका गल्लीत खूप सारी गर्दी दिसली. समोर पाहिलं तर मोत्झार्टचं जन्मस्थान लिहिलेला बोर्ड !!! हेच ते ठिकाण ज्यासाठी आम्ही इथे आलो.  पिवळ्या रंगात रंगवलेली ती इमारत खरं तर बाकीच्या इमारतींसारखीच होती. बाकीआजूबाजूला अशाच साऱ्या साधारण ५ मजली इमारती. फक्त रंग अगदी वेगळा इतकंच. बाहेर जत्रा भरलेली. चिंचोळ्या जिन्यावरून वर गेल्यावर मोत्झार्टचं घर लागलं. हे एक घर सोडलं तर  बाकीच्या सगळ्या घरात लोक राहत होते. काही ऑफिसेसहि होती. दरवाज्यातून आत गेल्यावर लगेचच त्यांचं स्वयंपाक घर होत. बाकीच्या खोल्याही तशा छोट्याच होत्या. बहुदा त्या काळी अशाच छोट्या खोल्या असाव्यात असे वाटले, कारण शेक्सपिअरच्या घरातही अशाच छोट्या खोल्या आम्ही पाहिलेल्या.असो. मोत्झार्टचे वडीलही खूप मोठे संगीतकार होते. त्यांच्या सर्व वस्तू इथं जपून ठेवल्यात. ज्यात त्यांची काठी, अंगठी, चष्मा , फोटोज अशा बऱ्याच वस्तू आहेत. तसंच मोत्झार्टने वाजवलेली व्हायोलिन, कि बोर्डहि आहे. काही पत्रं, नोटेशन्स अशा बऱ्याच वस्तू आपल्याला पाहायला मिळतात. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी वूल्फगँग मोत्झार्ट ने कला सादर केली. अवघे ३५ वर्षांचं आयष्य लाभलेल्या या प्रतिभाशाली कलाकाराने असंख्य अशा सांगीतिक रचना करून ठेवल्या ज्या आजही तितक्याच लोकप्रिय आहेत. त्यानं पाश्चात्य संगीतात एक स्थान निर्माण केलं आणि जगभर ते त्याच्यामुळंच पोहोचलं, लोकप्रिय झालं. त्याने ६०० च्या वर रचना केल्या ज्या आजही पाश्चात्य संगीतावर प्रभाव टाकतात. बीथोवेननेही त्याच्या पासूनच प्रेरणा घेतली. असा हा महान कलावंत या घरात जन्माला आला. ते घर ते शहर पाहायला मिळालं खरंच भाग्यच. तिथल्याच एक खोलीत त्याच्या रचना ऐकण्याची सोयही केलेली आहे.

तिथून खाली आलो. त्या गल्लीत तमाम उंची आणि जागतिक ब्रँन्डस ची दुकानं दोन्ही बाजूला आणि आत असलेल्या वाड्यात सजलेली. हे गावच गर्भ श्रीमंतांचं असल्यामुळं ते साहजिकच होतं म्हणा. आम्ही फिरत फिरत किल्ल्याकडे निघालॊ.  तिकडेच एक युनिव्हर्सिटी असल्याचं नामफलक दाखवत होता. पुढे एके ठिकाणी ओपन मार्केट लागलेलं. जिथं भाजी, फळं विक्रेते होते आणि खाण्याचे स्टालही लागलेले. काही रेस्टारंटसही होती. आम्ही तिकडेच काही खायचं ठरवलं. मग आम्हाला कळेलशी डिश घेतली. खाऊन निघालो. तिकडेही लालचुटुक चेरीज होत्याच. पुन्हा त्या घ्यायचा मोह झाला. या क्रोएशिया पेक्षा जास्त मोठ्या आणि लाल रसरशीत होत्या. अजुन एका प्रकारच्या पण होत्या तिथे, विचारल्यावर ती बाई म्हणाली कि त्या छोट्या इथल्या आहेत आणि मोठ्यावाल्या ज्या आहेत त्या इटली वरून आयात केल्यात. तिकडे छान ऊन असतं त्यामुळं त्यांची क्वालिटी जास्त चांगली आहे. अर्थातच त्या महाग होत्या, पण मी त्याच घेतल्या. अप्रतिम चवीच्या गोड !!!

तिथून किल्ल्यावर कसं  जायचे ते पाहत होतो. चांगला उंच दिसत होता. चढून वर जाणं अवघडच वाटत होतं . तेवढ्यात आम्हाला वर बघताना पाहून तिथल्या एका म्हाताऱ्याने लगेच सांगितलं,” तुम्हाला वर चढून जायची गरज नाही त्यासाठी फेनिक्युलर आहे.” आम्हाला हुश्श झालं. मग त्यानं दाखवलेल्या रस्त्याने आम्ही चालू लागलो. खालच्या चौकात खूप सारी नेहेमीच्या वस्तूंची म्हणजे माळा, टोप्या, कानातले,गळ्यातले, ब्रेसलेट, टी शर्ट , सुवेनिअर्स अशी दुकानं, म्हणजे स्टॉल लागलेले. तसंच बग्ग्या पण होत्या. तिथेच जरा पुढे तिकीटाची रांग लागलेली. बाहेरच एका कारंज्याला पाण्याचा नळही होता. मी आमच्या रिकाम्या झालेल्या पाण्याच्या बाटल्यात ते थंडगार पाणी  भरून घेतलं. युरोपात हे एक बरं आहे तुम्ही बिनधास्त टॅप वॉटर पिऊ शकता. तिकीट काढून फेनेक्युलर च्या रांगेला लागलो. १०-१५ मिनिटातच नंबर लागला. मोठाल्या फेनेक्युलरमध्ये खूप सारे लोक उभे राहू शकत होते. ती काचेची कुपी जसजशी वर चाललेली तसतसं साल्झबर्ग असं समोर दिसायला लागलं. खूप छान दृश्य होत. दोनच मिनिटात वर येऊन पोहोचलो. त्या किल्ल्याच्या तटबंदीवरून सगळं साल्झबर्ग असं एका कवेत दिसत होतं. मध्ये वाहणारी सालझार नदी आणि तिच्या दोन्ही बाजूला वसलेलं टुमदार देखणं साल्झबर्ग!!! मध्ये मध्ये असलेले ब्रिज, आणि मागे उंच आल्प्सच्या रांगा.  त्याच्या कुशीत वसलेलं शहर. म्हणूनच इतक्या सुंदर गावात मोत्झार्ट सारखा संगीतकार झाला तसंच साउंड ऑफ म्युझिक याच भूमीत जन्माला आलं. अगदी त्या शहराच्या मातीतच संगीत आहे जणू!!! 

ऊन मात्र कडकडीत होतं. चटका बसत होता. खरंतर आम्हाला वाटलेलं कि एवढं आल्प्सच्या  कुशीत असलेल्या साल्झबर्गला थंडीचं असेल. पण नाही. तो किल्ला फिरून पहिला. तसं फारसं बघण्यासारखं काही नव्हतं म्हणा. कुठं विहीर, कुठं चक्की, किल्ल्याची प्रतिकृती, भांडी, आणि शस्त्रं!!! फार काही ग्रेट वगैरे नव्हतं. पण तिथून निसर्गाचा आनंद घेणं, दूरवर पसरलेलं ते गाव, त्यातली घरं पाहणं हेच जास्त आनंददायो होतं. मघा आलेला रस्ता, तो ब्रिज, खालचं चर्च, सगळं वरून कसं दिसतंय, आपण कुठून आलो ते पाहायची मजा औरच. 

आता आम्ही परत निघालो. मघा आलेल्या रस्त्याच्या खाणाखुणा बघत चालत जात होतो. सकाळी असलेला उत्साह नाही म्हटलं तरी कमी झालाच होता. त्यात हे ऊन मी म्हणत होतं. घामाच्या धारा लागलेल्या. त्याने अधिकच दमायला होत होतं. जवळ म्हटलं तरी चांगला एक तास लागला. बस वगैरे कुठून कुठली करायची त्याची काहीच माहिती नसल्याने चालतच निघालेलो. तासाभरानं स्टेशन ला पोहोचलो. गाडी लागलेलीच होती.  पुन्हा सकाळचीच सीट मिळाली. इथे हे एक बराय कुठल्याही गाडीत बसलं तरी चालतं फक्त आपण ज्या कंपनीचं तिकीट काढलंय त्याच कंपनीची गाडी आहे ना त्याची खात्री करून घेतली म्हणजे झालं. कारण इथे ट्रेनही खाजगी असतात. 

पायाची वाट लागलेली चालून चालून. त्यामुळं सीटवर बसल्यावर कसं हुश्श झालं अगदी. ट्रेन सुटायला अजून अर्धा पाऊण तास होता. ५-१० मिनिटातच पावसाला सुरवात झाली. हायसं वाटलं अगदी नाहीतर पावसात अडकलो असतो. चांगला जोरदार पाऊस झाला. ट्रेन पण आता बऱ्यापैकी भरली. एक वयस्कर आणि  एक तरुण आणि एक पोरसवदा जोडपं येऊन बसले आजू बाजूच्या सीटवर. समोर बसलेले ते तरुण जोडपं आणि ते बाकीचे सगळे एकमेकांशी काहीतरी बोलत होते. मग तिकिटचेकर आली. तेव्हा मात्र त्या वयस्कर जोडप्याखेरीज बाकीच्या सगळ्यांनी वेगवेगळी तिकिटं घेतली तिच्या कडून. आणि पुढच्या स्टेशन्सवर ते एकेक करत उतारलेही. शेवटी ती मुलगी आणि ते जोडपं राहिलं जे सगळ्यात शेवटी उतरलं. पूर्ण प्रवासात एकमेकांशी गप्पा मात्र चालेल्या सगळ्यांच्या. आम्ही शेवटच्या स्टेशनवर उतरलो. तिथून पुन्हा आम्हाला मेट्रो ने आमच्या स्टेशन ला जायचे होते. उद्या रविवार असल्याने सारं मार्केट बंद असणार होतं हे आम्हाला नेटवर पाहिल्यावर समजले. खरं तर इथला शेवटचा दिवस आणि रविवार असं ठरवून आम्ही तो दिवस शॉपिंग साठी राखून ठेवलेला. पण इथल्या सुट्टीनं आमचा तसा पचकाच झाला. काहीतरी घरी घेऊन जायलाच हवं तर होतं पण कसं जमणार कळत नव्हतं. आमच्या स्टेशनवरच एक मॉल होता तोच आज जरा फिरून पाहून ठेवला. आता तर शक्य नव्हतं पण सोमवारी सकाळी लवकर जमतं का ते पाहायचं ठरवलं. कारण एअर पोर्टला जायला इथूनच मेट्रो होती. आता मात्र पायाचे अगदी तुकडे पडायचे बाकी होते. प्रचंड चालणं झालेलं आज. कधी एकदा घरी जातो आणि अंग टाकतो असं झालेलं. 

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *