सकाळी लवकर उठल्यावर आधी कपड्यांची अवस्था पाहिली.तसे बऱ्यापैकी वाळलेले होते. एखाद-दुसरा दमट असलेला मी ड्रायर ने वाळवून घेतला. बॅगा भरल्या. घर व्यवस्थित आवरून घेतलं. भांडीकुंडी जागच्या जागी ठेवून दिली. नाश्त्याचा डबा घेतला. आम्ही बरोबर यादी सकाळी सात वाजताची टॅक्सी बोलावली. सव्वासात ला टॅक्सी आली आणि ऍना पण आली. तिला बाय करून आम्ही निघालो.,बस स्टेशनला पोहोचलो पण आमची बस अजून लागायची होती. थोड्याच वेळात ती लागली. आम्ही आपले समोरची सीट पकडून बसलो. समोरच्या मोठ्या खिडकीतून सगळे छान दिसत होतं. प्रवास कंटाळवाणा होणार नव्हता. अर्थात युरोपात ती शक्यता कमीच असते म्हणा. प्रवास अगदी रम्य असतो. एकतर रस्ते सुन्दर, कुठेही ट्रॅफिक नाही आणि बहुतेक गर्द हिरवाई दिसते.बस पूर्णपणे भरली. तरुणींचा एक घोळका पण बसमध्ये चढला. बहुतेक लोक क्रका ला उतरणार होते. इथेही खूप सुंदर धबधबे आणि तलाव आहेत. मुख्य म्हणजे उथळ आहेत. त्यामुळे तिथे पोहायची परवानगी आहे. त्यामुळे लोकांची खूप गर्दी होते तिथे.
गाडी शहरातुन फिरून रस्त्याला लागली. आम्ही आलेला रस्ता नसावा असं वाटलं. कारण काही वेळानं गाडी क्रका या गावात गेली. येताना क्रका आम्हाला लागलेलं नव्हतं. गाडी थोडी वेगळ्या रस्त्यानं जात असल्याचं लक्षात आलं. क्रकाला बर्यापैकी लोक उतरले. गाडी गावातून फिरत होती. सुंदर दिसत होतं गाव. तिकडे रस्यावर पांढरे पट्टे मारण्याची कामे चालू होती. बाकी घराच्या आजूबाजूला वगैरे सगळीकडे लव्हेंडरची फुलं दिसत होती. जांभळी फुलांची दोन फुटांची झुडूपवजा गवतच ठेवलाय असं वाटत होतं. तसंच द्राक्षाची शेती दिसत होती. या भागात वाईनरीज भरपूर आहेत म्हणे. त्यामुळं खूपशी द्राक्षांची दूरवर पसरलेली हिरवीगार शेतं दिसत होती. अध्येमध्ये बोगदेही लागत होते. आतूनही सुंदर बांधलेले आणि गमतीची गोष्ट म्हणजे प्रत्येक बोगद्यात ठरावीक अंतरावर दोन्ही बाजूला किती अंतर आहे ते लिहिलेलं होतं. म्हणजे इकडे बाण करून 4822 मीटर आणि त्या बाजूला 1724 असं काहीसं. हे जरा वेगळं वाटलं आणि छानही! प्रवासात अशा गोष्टीने मनोरंजन ही होतं आणि माहितीही मिळते असं वाटलं.
वाटेत एका ठिकाणी नाश्त्यासाठी बस थांबली. पण प्रचंड गर्दी होती तिथे त्यामुळे आम्ही नुसतेच चिप्स आणि कोल्डड्रिंक घेऊन बसमध्ये येऊन बसलो. ते बरच केलं आम्ही कारण एकतर ते काय बोलतात ते कळत नाही आणि आपली गाडी नेमकी कोणती तेही लक्षात ठेवणं कठीणच कारण तिकडे अजून २-४ बसेस आलेल्या. उगाच आपण उशिरा यायचो आणि आपल्यासाठी बस थांबणं हे काही फार चांगलं नव्हेच. त्यात पुन्हा परदेशात इंडियन म्हणून वावरताना हे लोक असेच असतात असं कुणी म्हटलं तर देशाची इज्जत जाते. बस अगदीच १० मिनितातच लगेच निघाली.

वाटेत दूरवर गावं दिसत होती. अधेमधे शेती, बाकी जंगलच भरपूर. रस्त्यावर बाजूला जंगलात, झाडाखाली लाकडी बेंचेस ठेवलेले, त्यावर कुणीतरी बसलेले दिसले. किती छान सोय असते हि असं मनात आलं. हे असे बेंचेस सगळ्या युरोपभर पाहायला मिळतात. मध्ये टेबल आणि दोन्ही बाजूला जोडून असलेले बेंचेस.
काही वेळाने आम्ही झाग्रेब मध्ये प्रवेश केला. काही लोक रस्त्यावरची हिरवळ कापत होते. काही झाडाझुडपांची कटिंग करत होते. सगळी व्यवस्थित निगा राखतात त्यामुळे सुंदर दिसतं. बुधवार असल्याने रस्त्यावर बऱ्यापैकी लोकांची लगबग चालू होती. थोड्याच वेळात बस स्टँडवर पोहोचली. बाहेरच असलेल्या ट्राम स्टेशनकडे आलो. तिथेच असलेल्या पेपर स्टॉल वरून तिकीट घेतले. सगळंच कसं लोकांच्या सोयीचं !!! काही मिनीटातच पुन्हा आमच्या अपार्टमेंट ला आलो. आमचा ओनर आमची वाटच पाहत बसलेला होता. त्याच्याशी थोड्या गप्पा मारल्या. उद्या आम्हाला परत जायचं होतं. त्यामुळे सकाळी तो परत येणार होता चावी घ्यायला. आम्ही गेल्यावर अमेरिकन जोडपं इथं राहायला येणार आहे म्हणाला. त्या लोकांनी आठवडाभर बुक केले असल्याने त्याला आठवडाभराची सुट्टी मिळणार होती. त्यामुळे तोही पोर्टवर सुट्टीला जाणार होता. हाही एक पैलू एयर बी न बे चा कळाला.
थोड्यावेळाने आम्ही आराम करून बाहेर पडलो. आज मुझियम ऑफ ब्रोकन रिलेशनशिप जे एक अतिशय अनोखं असं मुझियम आहे ते पाहायचं होतं. मग अपर टाऊन असं बरंच काही पाहायचं होत. अर्थात सगळं अगदी हाकेच्या अंतरावर असल्याने पटकन पोहोचणार होतो.
प्रथम इथल्या कॅथेड्रल ला पोहोचलो. नऊशे वर्षांपूर्वी बांधलेलं निओ गॉथिक स्टाईलचं आहे. संपूर्ण क्रोएशियातील हि सर्वात उंच इमारत आहे. येथे आत मेरी ऑफ अझम्पशन ची मूर्ती आहे. त्याची ओळख असलेले 354 फूट उंचीचे दोन मिनार लांबूनही सगळ्या शहरातून सहज दिसत असल्या कारणाने एक महत्त्वाची खूण आहे.आतही त्याच्या डागडुज्जीचं काम चालू आहे . कॅपिटॉल भागात असलेले हे चर्च एक रोमन कॅथलिक संस्था आहे.ही इमारत फार सुंदर आहे. प्रवेशद्वाराशी दोन्ही बाजूला उंच असे घोटीव तीन तीन खांब आहेत. त्यावर प्रेषितांच्या सुंदर अशा कोरीव मूर्ती आणि प्रवेशद्वारावरही सुंदर कलाकुसर केलेली आहे. लाकडी दरवाजातून आत प्रवेश केला. समोरच मदर मेरीची बाळयेशू सोबत अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे. एका काचेच्या कॉफिन मध्ये अलोंजीए स्टेफिनॅक ची प्रतिकृती ठेवली आहे. सुंदर कलाकुसर केलेले खांब छताला असलेली शॅंडेलिअर्स, बाजुच्या रंगीत काचेची तावदन आणि पेंटींग्स त्या कॅथीड्रलंच्या सौंदर्यात भरच घालतात.काचेच्या रंगीत खिडक्या आत अतिशय गंभीर वातावरण होतं. काही भाविक प्रार्थना करत बसले होते. लहान मुलांना घेऊन एक टीचर तेथे आलेली. ती त्यांना आवाज न करता निरीक्षण करायला सांगत होती. मुलही गुपचूप सारे कुतूहलाने पाहत होती. ती त्यांना काहीतरी सांगत होती. थोडा वेळ तिथे बसून आम्ही म्युझियम ऑफ ब्रोकर रिलेशनशिप्स या जगातल्या एकमेव अशा प्रदर्शनाला भेट द्यायला गेलो.

मानवी नात्यात येणारे दुरावे कधी कधी मनाला खूपच वेदना देऊन जातात. नाती तुटतात तेव्हा जास्तच दुःख होतं. अशा तुटलेल्या नात्याशी संबधित वस्तू लोक आणून देतात आणि त्यासोबत त्यामागची घटना सांगतात. या अनोख्या म्युझिअमच्या संकल्पनेला दोन प्रेमिकांच्या तुटलेल्या नात्याने सुरुवात झाली. चित्रपट निर्माती ओलिन्का विस्तीचा आणि तिचा शिल्पकार मित्र द्राझेन गृबीसीच यांच्या चार वर्षांच्या प्रेमाचा शेवट 2003मध्ये झाला. तीन वर्षानंतर गुब्रिसीच ने व्हिस्टिका ला भेटून तिला ही संकल्पना सांगितली. तिलाही ती आवडली. अशा रीतीने या म्युझिअमचा जन्म झाला. त्यांनी त्यांच्या मित्रांना पण त्यांच्या वस्तू द्यायला सांगितलं आणि 2006 साली हे म्युझियम अस्तित्वात आलं. लोकांनाही ही कल्पना खूप आवडली आणि मग जगभरातून लोक त्यांच्या तुटलेल्या नात्याच्या गोष्टी सांगायला लागले. काय नाही तिथं? बालपणीची मैत्री तुटली म्हणून पाठवलेलं सॉफ्ट टॉय, व्यवसायिक आणि त्याचबरोबर असलेले प्रेमाचे संबंध तुटले म्हणून त्यावेळी घातलेले सँडल्स, बायको पासून विभक्त झालेल्या नवऱ्याने मुलांची आठवण म्हणून जपलेली फ्रेम. लहानपणी आईला घरातल्यांनी हाकलून दिलं तेव्हा तिची आठवण म्हणून जपून ठेवलेलं लाटणं मोठी झाल्यावर आईला घरी परत आणलं तेव्हा त्या मुलीने इथे ठेवलंय. किशोरवयात शेजारच्या मुलाने लिहिलेले प्रेमपत्र मिळालं तेव्हा खूप उशीर झालेला. त्यांनं आत्महत्या केलेली तो पर्यंत ते पत्र. नवऱ्याने कर्ज काढून खूप सुखात ठेवलं, पण कर्जाचा डोंगर उभा करून ठेवला. म्हणून उद्वेगानं दान केलेला वेडिंग गाऊन. अगदी एका चरसी असलेल्या स्त्री ने नंतर पोलीस झाल्यावर ठेवलेलं नशेचे इंजेक्शन हि आहे. एका स्त्रीने नवऱ्याने तिला लग्नांनंतर दुसऱ्या एका बाईसाठी हिला सोडले. मग हिने जिद्दीने पुढचं आयुष्य यशस्वी केलं. त्याची एक आठवण म्हणून एक फ्रेम दिलीय. एक स्त्री वयानं लहान असलेल्या मुलाच्या प्रेमात पडली. पण घरातल्याना ते शेवटपर्यंत कळलं नाही. त्याची आठवण म्हणून एक सीडी दिलीय. अशा खूप सार्या गोष्टी वाचायला, बघायला मिळतात. मानवी नात्यांचे असे असंख्य कांगोरे इथं उलगडतात. असंख्य उदाहरणं आपल्याला भेटतात. नात्यांची गुंतागुंत आपल्याला अंतर्मुख करते. हि संकल्पना लोकांना इतकी आवडली कि नंतर अशी म्युझियम्स जगात अनेक ठिकाणी उघडली. पण लोक खरच का देत असतील या वस्तू? स्वतःचं दुःख वाटून मोकळं झाल्यासारखं वाटत असेल का? कि मनातली खडखड उघड करत असतील? पण काही असो असं लोकांच्या कहाण्या बघून, वाचून दुसऱ्या एखाद्या अशाच पीडित जीवाला दिलासा मिळत असेल का? किंवा त्याच्याही दुःखाला कुठंतरी मोकळी वाट मिळत असेल का? असे प्रश्न मला पडले खरे. असो .

तिथून आम्ही फिरत पुढे आलो. इथं टायचं मोठठं दुकान आहे. त्याच्या बाहेर भली मोठ्ठी टाय लावून ठेवली आहे. दुकानातही बऱ्याच`मोठ्ठाल्या टाईज लावून ठेवल्यात. टाय हीच मुळी क्रोएशियाने जगाला दिलेली देणगी आहे. सर्वात मोठा टायचा रेकॉर्डही त्यांच्याच नावावर आहे.

तिथून सेंट मार्क चर्च पहायला गेलो. मोठ्या चौकात हे तेराव्या शतकात उभारलेले अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असं चर्च आहे. त्याच्या छपरावर दर्शनी भागावर निळी पांढरी लाल नक्षी आहे आणि एका बाजूला लाल पार्श्वभूमीवर व्हाईट कासल आहे तर दुसर्या बाजूला स्लोव्हेनिया, क्रोएशिया आणि डाल्मेशियाचं प्रतीक आहे. हेच चित्र आपल्याला सगळीकडे क्रोएशियाचं प्रतीक म्हणून दिसतं. त्याच्याच बाजूला त्यांची पार्लमेंट आहे आणि त्याच भागात त्यांच्या अन्य प्रशासकीय इमारती ही आहेत.

जरा पुढे आलो त्या ठिकाणाहून समोर अतिशय विहंगम दृश्य दिसत होतं. सूर्य अस्ताला गेलेला आणि मस्त संधीप्रकाश सगळीकडे पसरलेला. दिवे लुकलुकू लागलेले. त्यामुळं तर त्या सगळ्या दृश्याला एक सुन्दर रोमँटिक बाज चढलेला. हे अपर टाऊन म्हणजे कॅपिटॉल आणि समोर खाली दिसतं ते लोअर टाऊन म्हणजे डोनीग्राड. समोर दूरवर पसरलेलं झाग्रेब अतिशय सुंदर दिसत होतं. इथून खाली जाण्यासाठी आणि वर येण्यासाठी फेनिक्युलर आहे. अपर आणि लोअर टाऊनला जोडणारी हि फेनिक्युलर फक्त 66 मीटरची आहे. बहुदा जगातील सर्वात लहान असावी. १८९० साली बांधलेली पण नंतर काही वर्ष बंद होती पण 1974 साली पुन्हा दुरुस्त करून वापरात आणण्यात आली. तेव्हापासून ही व्यवस्थित माणसांची खाली वर ने आण करत आहे. एका मिनिटापेक्षा थोडा अधिक वेळ तीला यासाठी लागतो. साधारण 28 माणसं त्यातून प्रवास करू शकतात. अशा दोन फेनिक्युलर तिथे आहेत. आपल्याकडे हा प्रकार क्वचित कुठेतरी पाहायला मिळतो. अलीकडे सप्तशृंगी गडावर सुरू झाला आहे. लोकांच्या सोयीच्या गोष्टी त्यांना सहज उपलब्ध करून देण्याची नाही तरी आपल्याकडे वानवाच आहे, असो.

जरा पुढे लहान मुलांसाठी करमणुकीचा कार्यक्रम चालू होता. पपेट शो मुलं मजेत पाहत होती, चित्कारत होती. आम्ही आपले फिरत सारं पाहत पुढे जात होतो. पुढे एका भिंतीवर ग्राफिटी रेखाटलेली. निकोला टेसलाचं भव्य चित्र भिंतीवर रेखाटलेल. निकोला टेस्ला हा महान भौतिक शास्त्रज्ञ क्रोएशियाचा होता, त्याचा सार्थ अभिमान इतल्या लोकांना आहे.
अपर टाऊन मध्ये भटकून आम्ही परत खाली आलो. उद्या सकाळी आम्हाला व्हिएन्नाला जायचं असल्यामुळे नाश्त्यासाठी ब्रेड वगैरे काहीतरी घ्यायचं होतं, म्हणून सुपर मार्केटमध्ये गेलो. इथं सगळ्या वस्तू मोठ्या मोठ्या पॅकमध्येच मिळतात. जॅम, केचअप सारं मोठ्या बॉटल मध्येच. बाकीच्या साऱ्या गोष्टीही तशाच. आपल्यासारखं पाऊच ची भानगड नाही. त्यामुळं जरा पंचाईतच होते. मोठ्या पॅकेजमध्ये बटर होतं पण आम्हाला तेवढं नको होत. आणि बटरला त्यांच्या भाषेत काय म्हणतात तेही कळेना. इंग्लिश जरी लोकांना येत असलं तरी सगळ्यांना येतंच असं नाही. पण आमच्या नशिबाने तिथला एक कर्मचारी आमच्या मदतीला आला. आम्ही इंडियान आहोत ते कळलं त्याला, तो लंडनमध्ये असताना नमस्ते, शुक्रिया असे दोन हिंदी शब्द शिकला होता. ते त्यानं बोलून दाखवले. आम्हाला काय हवं तेही त्याला बरोबर कळलं. त्यानंच ते आम्हाला दाखवल आणि शुक्रिया नमस्ते करून तो निघून गेला. तेव्हढ्यानेही किती छान वाटलं आम्हाला. आम्हीही बटर,ब्रेड, बिस्किटं,ज्यूस इत्यादी घेऊन निघालो.
अपार्टमेंटच्या खालच्या एका रेस्टॉरंटमध्ये डिनर घ्यायचं ठरवलं. टीव्हीवर कोणतीतरी फुटबॉलची मॅच लागलेली. मोठया स्क्रीनवर बाहेर लावलेली. तिकडेच जाऊन बसलो. बाजूच्या टेबलवर काही लोक बसलेले होते बिअर, सिगरेट पीत होते. थोड्यावेळाने समोरच्या दुकानातून एक स्त्री बाहेर आली. तिने दुकानाचे काचेचे दार बंद केलं आणि त्यांना जॉईन झाली. ते काचेचे दार एवढीच काय ती सेक्युरिटी, बाकी लोखंडी शटर वगैरे भानगड नाही. आत डिम लाईटही चालू होता. मजा वाटते आपल्याला. तिकडे जेवण करून आम्ही आमच्या घरी आलो.
Leave a reply