• Menu
  • Menu
Lake_Scene

Why TravelSmita?

प्रवासाची तयारी… तुम्हीच प्लॅन करा तुमची टूर..!!!!

कुठल्याही प्रवासाची तयारी करताना आधी कुठे जायचं आहे बसायचं आहे किती दिवस जायचं आहे किती खर्चाची तयारी आहे. कोण कोण जाणार, जिथे जाणार तिथले हवामान ,चलन, इत्यादीची व्यवस्थित माहिती काढून ते एका कागदावर व डायरीत लिहून घ्या म्हणजे सगळा अंदाज व्यवस्थित बांधता येईल आणि त्याप्रमाणे नियोजन करता येईल.

तिकिटे कुठून बुक करायची कशी करायची?

विमानाची तिकीट बुक करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते बरेच आधी जर बुक केले तर कमी दरात आपण बुक करू शकतो, त्याकरिता वेगळ्या वेबसाईटवर जाऊन दर काय आहेत याची चाचपणी करा. साधारण एक आठवडा रोज केल्यावर तुमच्या लक्षात येईल की कधी कमीत कमी दर मिळतायत, कोणत्या कंपन्यांचे दर काय आहेत. साधारण प्रवासाचा वेळ जितका कमी तितके दर अधिक असतात. कुठं मधला थांबा, ले ओव्हर आहे का ते पाहून घ्या. शक्‍यतो दोन तीन तासाचाले ओव्हर असलेला बरा असतो कारण कनेक्टिंग फ्लाईट जिथून आहे तिथे पोहोचल्यावर पहिल्या फ्लाईट मधून उतरलेल्या टर्मिनस पासून कनेक्टिन्ग फ्लाईट च्या टर्मिनस पर्यंत पोहोचायला वेळ लागतोच, कारण उतरल्यावर ती फ्लाईट कुठे लागणार, तिथे कसं जायचं हे सारं बघण्यातही वेळ जातो. त्यासाठी हातात बर्‍यापैकी वेळ असलेला बरा असतो. आधीची फ्लाईट जराही उशिरा निघाली तरी आपली गडबड होते. शिवाय त्यांचे एअरपोर्ट प्रचंड मोठे असतात त्यामुळे भरपूर चालावं लागतं. त्यात वेळ जातो. या सर्वांचा विचार करून मग फ्लाइट निवडा.
विमान तिकिटे हि साधारण मंगळवार, बुधवार आणि गुरुवार या दिवशी तुलनेने स्वस्त असतात. आपल्याला ट्रीपलाच जायचे असल्याने शक्य असेल तर हे दिवस निवडल्यास आपला खर्च कमी होऊ शकतो. तसेच ज्या ठिकाणी जाणार तिथूनच रिटर्न फ्लाईट असेल तरीही तिकिटं स्वस्त पडतात. पण आपण असा प्लॅन फार कमी वेळा करू शकतो. एकाच देशाचा प्लॅन असेल तरच हे शक्य होते.

व्हिसा

व्हिसासाठी अप्लाय करताना तुमचे फोटो, पासपोर्ट, बँक स्टेटमेंटस, इन्कम टॅक्स रिटर्न्स अशा गोष्टी ज्या त्यात नमूद केल्या आहेत त्या लागतात जोडाव्या लागतात. हे सारं कशासाठी लागतात? नाही दिलं तर चालणार नाही का? त्या ऐवजी हे चालेल का? असे प्रश्न विचारू नयेत. त्या त्या देशाचे जसे नियम असतात, तशी ती ती कागदपत्र द्यावीच लागतात. हुज्जत घातल्यास व काही बाही प्रश्न विचारल्यास व्हिसा रिजेक्ट होऊ शकतो हे ध्यानात घ्या. त्याचबरोबर तुमचा ट्रॅव्हल प्लॅन, वेगवेगळ्या देशात जर एन्ट्री पॉईंट असतील तर त्या प्रवासाची तिकिटं, त्या त्या ठिकाणची हॉटेल वा तत्सम बुकिंग्ज , इ. कागदपत्र जोडणे अनिवार्य असतं. युरोपसाठी शेन्जेन व्हिसा लागतो. बाकी देशांसाठी स्वतंत्र व्हिसा लागतो किंवा कसे ते त्या त्या देशाच्या वेबसाईटवर संबंधित माहिती मिळू शकते. व्हिसासाठीचा कालावधीही पंधरा ते वीस दिवसांचा असू शकतो. त्यामुळे त्याप्रमाणे आपला प्लॅन करून व्हिसासाठी अप्लाय केलेला बरा, कारण पूर्ण प्रोसेस होऊन व्हिसा मिळून तो आपल्याला पोहोचेपर्यंत महिनाभराचा कालावधी धरून चालावं लागतं. हे सर्व बरच आधी करून ठेवलेलं कधीही चांगलं , अन्यथा निष्कारण आपले टेन्शन वाढू शकते.

देश निवडताना कसे निवडावे?

देश निवडताना आधी तुमची आवड काय आहे ते ठरवा म्हणजे वास्तु ऐतिहासिक वास्तू पाहायच्या आहेत ? की निसर्ग प्राधान्याने पाहायचा आहे ? ते निश्चित करा. युरोपमध्ये दोन्ही पाहायला मिळतात. पणतरीही आपणच ठरवायचे आहे की आपल्याला काय पाहायला आवडणार आहे. तसंच पश्चिम युरोपातील देश हे तुलनेने महाग असतात. कारण ते श्रीमंत देश असल्याने त्यांचे राहणीमानही त्याच प्रकारचे असते. त्याच प्रमाणात तिथल्या हॉटेलचे, ट्रॅव्हलचे, खाणे पिणे , प्रवेश तिकीट, व इतर गोष्टींचेही सारे दर त्याच प्रमाणात असतात हे लक्षात ठेवावं लागतं. आणि तुलनेत इथे रुपयात कमावलेले तिकडे युरो मध्ये खर्च करताना जीवावर येतच त्यामुळं अगदी काटेकोरपणे खर्च करावा. त्यामानाने पूर्व युरोप स्वस्त आहे. तर त्याचाही विचार करावा.
युरोपमध्ये फिरताना तिथला निसर्ग हा पाहण्यासारखा तोच असतोच पण त्याचबरोबरीने ऐतिहासिक वास्तू व म्युझियम झूम इत्यादी गोष्टीही पाण्यासारख्या असतात. त्या सर्वांची माहिती काढून प्लॅन करता येतो.
आपल्याला किती दिवसाचा टूर प्लॅन करायचा आहे, ते सर्वात महत्त्वाचं असतं त्यात येण्याचा जाण्याचा अधिक एक दिवस ठेवावा लागतो. कारण आपण तिथे पोचलेला दिवस बऱ्याचदा जेट ल्याग मध्ये जाऊ शकतो. त्यामुळे त्यादिवशी किती फिरता येईल हे ज्याच्या त्याच्या वर क्षमतेवर अवलंबून असते. मग किती ठिकाण पाहायची आहेत त्याची व्यवस्थित यादी करून घ्यावी. ठिकाणांमधील अंतर किती आहे. तिथे कसं जाता येतं, म्हणजे ट्रेन, बस, जहाज, फ्लाईट ते बघून त्याप्रमाणे आपल्या बजेटनुसार व सोयीनुसार ते ते बुकिंग कराव. त्या प्रवासाचा कालावधी किती ते नमूद करावा म्हणजे उरलेला वेळ किती, त्यात काय काय पहाता येईल याचं नियोजन करता येत. त्यांच्या प्रवासाच्या वेळा अचूक असतात त्यामुळे नियोजन करणे सोपे असते. एक-दोन तास दोन्ही ठिकाणाचा जास्तीचा धरून चालावा म्हणजे अचूकतेने नियोजन करता येते.

किती खर्च येईल?

हा सर्वात महत्वाचा मुद्दा असतो. कारण बजेट हा कळीचा मुद्दा असतो. आपण इथे रुपयात कमावलेले पैसे तिंते युरो, पौंड वा डॉलर मध्ये खर्च करणे जीवावर येते हे खरेच, त्यामुळे कमीतकमी पैशात जास्तीत जास्त पदरात पडून घेणे हे आपलं उद्दिष्ट असत. म्हणून त्यानुसार आपले नियोजन असावे लागते. अतिशय काटेकोर नियोजन केले तर हे सहज शक्य आहे. हे आम्ही केलेलं आहे त्यामुळं मी ठाम पणे हे सांगू शकते की टूर कंपनी तर्फे जाण्यापेक्षा आपण आपली टूर प्लॅन केली तर आपले पैसे निश्चित वाचतात.इंटरनॅशल ट्रॅव्हल कार्ड इथूनच करून त्यात हवे तेवढे पैसे भरून ठेवा. म्हणजे कुठेही प्रॉब्लेम येत नाही आणि खर्चावरही नियंत्रण राहते.

काय काळजी घ्याल?

प्रवासाला निघताना सर्वात आधी आपली तिकिटे, सगळीकडची तिकिटे, बुकिंग डिटेल्स, पासपोर्ट इ. गोष्टी एका पाकिटात व्यवस्थित ठेवून घ्या. घाईघाईत तेच राहिलं असं नको व्हायला. नंतरही तो पासपोर्ट सतत चेक करत राहा. सोबत असू द्या. जाताना डॉलर व त्यांची जी कोणती करेन्सी असेल ती आपल्याला हवी तेवढी इथूनच करून घ्या ती वेगवेगळ्या ठिकाणी आणि आपल्या बरोबरच्या लगेज मधेच ठेवा. चेक इन लगेज मध्ये मूल्यवान वस्तू ठेवू नका. तसेच केबिन लगेज मध्ये २ दिवसांचे कपडे, आवश्यक वास्तू हे सारं अवश्य ठेवा, कारण कधी कधी लगेज दुसऱ्या दुकानी जाण्याची शक्यता असते ते मिळेपर्यंत आपले कपडे असायला हवेत, त्यामुळे स्वेटर, इंनर्स, इ सारं केबिन लगेज मध्ये ठेवा.
युरोपात प्रवास करणं हे तसं खूपच सुरक्षित आणि तुलनेनं सोपे असतं.( सोपं अशासाठी कि त्यांच्याकडे पब्लिक ट्रान्सपोर्ट अतिशय सुंदर आणि सोयीचा आहे. सगळीकडे तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरू शकता. ) युरोप ट्रीप ला जाताना मे महिन्यानंतर जाणार असाल तर तुलनेने थंडी कमी असते. जून जुलै मध्ये तर बऱ्याच ठिकाणी उकाडा असतो वा अतिशय प्लेझंट म्हणावं असं वातावरण असत. त्यामुळं त्यानुसार गरम कपडे घेऊ शकता. छत्री वा रेनकोट, रेन जॅकेट हे मात्र अगदी गरजेचं आहे.

एयर बी न बी. …

एअर बी न बी हा तसा नवीन प्रकार असला तरी आता बऱ्यापैकी सर्वाना माहित असलेला आहे. यात राहण्यासाठी हॉटेल न वापरता कुणाच्यातरी घरात पेइंग गेस्ट म्हणून राहता येत. त्यात ब्रेक फास्ट आणि बेड म्हणजे राहणे समाविष्ट असते. हे तुलनेने स्वस्त तर पडतच पण स्थानिक लोकांशी बोलता येतं. त्यांच्या घरात राहता येतं त्यामुळं एक वेगळा अनुभव मिळतो.
दुसरा प्रकार पूर्ण अपार्टमेंट काही दिवसांसाठी भाडयाने घेणे हा असतो. यात तुम्हाला किचन पण मिळत असल्याने तुम्ही स्वयंपाक पण करू शकता. आणि पूर्ण घर मिळत असल्याने निवांत फिरू पण शकता कारण एका खोलीत राहण्यापेक्षा सगळ्या घरात फिरायला मिळते. आपला आपला सकाळचा हवा तसा चहा करून पिता येतो, बाकीही काही करून खाता येत. त्यामुळं पैसेही वाचतात आणि आपलं जेवण मिळतं ते वेगळंच सुख असतं.
फक्त भांडी वगैरे घासून , बाकीचं यावरून ठेवावं लागतं हे मात्र नक्की !!!!

एअर बी न बी एक्सपेरियन्स

हा एक वेगळाच प्रकार एअर बी न बी ने उपलब्ध करून दिला आहे. एखादा गाईड आपण बुक करू शकतो ज्याचा आपण छान उपयोग करून घेऊन तिथली संस्कृती, खाणं पिणं, ई जाणून घेऊ शकतो. यात फूड , म्युझियम्स, ऐतिहासिक वास्तू, ऍडव्हेंचर ई बऱ्याच गोष्टी यात असतात. त्या तुम्ही त्यांच्या वेबसाईट वर पाहू शकता.

शॉपिंग…

शॉपिंग म्हणजे अगदी मस्ट असलेला प्रकार!!! पूर्वी आपल्या देशात बऱ्याच गोष्टी मिळायच्या नाहीत तेव्हा विदेशातून त्या कोणी घेऊन आलं कि भारी वाटायचं पण आता तशी परिस्थिती नाही. तरीही काही तरी खरेदी केल्याशिवाय ट्रिप पूर्ण झाल्यासारखी वाटत नाही आणि घरी असलेल्या लोकांसाठी काहीतरी तिकडून आणलं कि सगळ्यांनाच छान वाटत. विशिष्ट देशातून आणलेली गोष्ट वेगळाच आनंद देते हे नक्कीच. त्यामुळं काहीतरी खरेदी हि करावीच. त्यासाठी त्या विशिष्ट ठिकाणची एखादी गोष्ट जरूर घ्यावी. शक्यतो कपडे, गरम कपडे खरेदी करावेत जे तिथे चांगल्या दर्जाचे मिळतात. बाकी चप्पल, बूट, क्रोकरी, असल्या वस्तू घेऊ नयेत.
हौस आणि पैसा असेल तर घड्याळं वगैरे खरेदी करू शकतो.
चोकोलेट्स हि आवर्जून आणावीत. वेगवेगळ्या चवीची, प्रकारची अशी असंख्य व्हरायटी तिथे मिळतात. सुपर मार्केट वा एयर पोर्ट वरही तुम्ही घेऊ शकता.
तिथल्या स्थानिक काही हँडीक्राफ्ट वस्तू खरेदी करू शकता.

विमान प्रवास करताना…

विमान प्रवास करताना आणखी एका गोष्टीची काळजी घेण्याची गरज असते ती म्हणजे लगेज. ते किती नेण्यास परवानगी आहे त्याची नीट माहिती मरून घ्या. तिकिटावर ते दिलेलं असत. त्याप्रमाणेच ते भरा अन्यथा एअर पोर्ट वर निष्कारण फजिती होण्याची शक्यता असते. आपलं हसेही होऊ शकत. प्रथमच प्रवास करत असाल तर या गोष्टी नवीन असतात. केबिन लगेज आणि चेक इन लगेज किती न्यायचे ते नीट बघा. त्याप्रमाणेच आपल्या बॅगा भरा. तसेच केबिन लगेज मध्ये रोजच्या वापराचे १-२ कपडे, थंडी असेल तर जॅकेट, प्रसाधनं, इंनर्स, आवश्यक गोष्टी, छत्री इ. घेऊन ठेवा कारण लांबच्या प्रवासात ले ओव्हर म्हणजे विमान बदल असतोच. अशा वेळी आपल्या प्रस्थानाच्या विमानात टाकलेलं सामान यदाकदाचित आपल्या दुसऱ्या विमानात नाही टाकले गेले तर कधी कधी ते मिळायला उशीर होऊ शकतो हे लक्षात असू द्या. ते सामान गहाळ होत नाही. पण तसे झाले तर विमान कंपन्या ते भरून देतात, किंवा भरपाई देतात. ते सारं तिकीट बुक करताना वाचून घ्या) पण तो पर्यंत आपल्या पाशी काही कपडे असणं गरजेच असत. त्यामुळं हि काळजी घेतलेली बरी. तसेच चेक इन लगेज मध्ये नाजूक वस्तू, किमती वस्तू शक्यतो ठेवू नयेत. सहसा आपण परतताना याची काळजी घ्यावी कारण जर काही खरेदी केलेली असेल तर ती केबिन लगेज मधेच ठेवावी. कारण तसेही परत येताना जवळ कपडे बाळगण्याची गरज नसते तेव्हा हेच सामान त्यात ठेवावे.

काही टिप्स ——-

१.कुठेही फिरायला जाताना चांगले शूज असणं आवश्यक आहे. तसेच एखादा एक्सट्रा जोड असणंही गरजेचं आहे. नवीन शूज घेतले असतील तर ते आधी नीट वापरून पाहा.

२.फिरायला गेल्यावर आपल्यासोबत काही खाण्याचे पदार्थ असणं कधीही चांगलंच. कारण कुठे काही मिळालं नाही तर पंचाईत होऊ शकते. तसंच बाहेरच्या देशात बऱ्याचदा तिखट पदार्थ मिळत नाहीत, तेव्हा आपल्या सोबत शेंगदाण्याची वगैरे चटणी ठेवू शकता.

३.पैसे शक्यतो दोन तीन ठिकाणी ठेवा जेणेकरून काही अघटित घडले तरी अडचण येणार नाही.

४.चेकिन लगेज मध्ये मूल्यवान वस्तू ठेवू नका.

५.खाण्याचे पदार्थ शक्यतो चेकिन लगेज मधेच ठेवा.

६.चलन बदलताना त्याचा दर बघून बदला.

७.युरोप मध्ये फिरताना दिवसाचे, २-३ दिवसाचे असे पास मिळतात ते एकदा बघून घ्या कारण ते बरेच स्वस्त पडतात. काही एन्ट्री फीस पण त्यावर फ्री होतात.

८.मोठं मोठ्या ने बोलणे, लोकांना निरखून बघणे या गोष्टी करू नका. दुसऱ्या देशात तुम्ही अ ब क नसून फक्त भारतीय असता हे लक्षात ठेवा. तुमच्या वागण्याने सगळे भारतीय बदनाम होऊ शकतात हे ध्यानात ठेवा.

९.पासपोर्ट कुठे दिला तर परत घ्यायला विसरू नका.

१०.इंटरनॅशनल चार्जर,प्लग अत्यंत आवश्यक आहे कारण प्रत्येक देशात चार्जिंग ची वेगळी व्यवस्था असू शकते. तसेच चार्जर, बॅटरी हे बरोबर ठेवा.

११.डे टूर बॅग, सॅक … त्याला एखादं वॉटर प्रूफ कव्हर असेल तर उत्तम.

१२… शक्यतो जीन्स … ३-४ पुरतात.

१३… २-३ ट्रॅक पँट्स

१४…साधारण दिवसाला एक असे टी शर्ट व टॉप वजनाला हलके असलेले बरे जे थोड्या जागेत मावतात.

१५.. इथूनच तुमचे इंटरनॅशल रोमिंग करून घ्या. अथवा तिथे त्या त्या देशात तुम्ही सिमकार्ड विमानतळावरच घेऊ शकता.

१६.. पॅकिंग करताना ते थोडं आटोपशीर आणि व्यवस्थित केलं तर कमी जागेत जास्त सामान तर बसतच त्याच बरोबर ते पटकन मिळतही. त्या साठी काही ऑर्गनिझर्स मिळतात बाजारात जेणेकरून सगळ्या वस्तू कपडे यांचं व्यवस्थित वेगवेगळं पॅकिंग करता येतं ते शक्य झाल्यास घ्यावं. जसं की …

बाकी माहिती तुम्ही मला मेसेज करून विचारू शकता.